कर्जत शहरातील एक हजार नागरिकांचे किल्ले रायगड दर्शन

| नेरळ | प्रतिनिधी |

शिवसेना कर्जत शहर आणि आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून श्रीमद्‌‍ रायगड दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत शहरातील तब्बल एक हजार नागरिकांना किल्ले रायगड दर्शन घडवीत आ. महेंद्र थोरवे फाऊंडेशनने सर्व शिवप्रेमींचा उत्साह द्विगुणित केला. दरम्यान, कर्जत शहरातील शिवप्रेमी तब्बल 21 बसेसमधून रायगड दर्शनासाठी किल्ले रायगडावर पोहोचले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी बनविलेल्या किल्ले रायगडाची भव्यता सर्वांच्या कायम स्मरणात राहवी यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन आणि शिवसेना कर्जत शहर यांच्या माध्यमातून त्रिपुरारी पौर्णमेनिमित्त श्रीमद्‌‍ किल्ले रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन केले होते. 26 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता कर्जत येथील बाळासाहेब ठाकरे भवन येथून कर्जत शहरातील तब्बल एक हजार शिवप्रेमी हे या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यासाठी आयोजक कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे आणि कर्जत नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी 21 बसेस यांची व्यवस्था केली होती.

गडकिल्ल्यांचे अभ्यासक सागर सुर्वे यांनी या मोहिमेत किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकची जागा असलेली राजमहाल, मेघडंबरी, महाराजांच्या समाधीचं ठिकाण, बाजारपेठ जगदीश्वराचे मंदिर, टकमक टोक, पाण्याचे जलस्तोत्र, बुलंद दरवाजा, नगारखाना,होळीचा माळ अशा महत्त्वाच्या ठिकाणी सर्वांना नेवून त्या त्या ठिकाणचे महत्व यांची माहिती इतिहासाचे दाखले देवून दिली.कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक आणि आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनचे विश्वस्त संकेत भासे यांनी किल्ले रायगडावर पोहचल्यानंतर सहभागी सर्व नागरिकांना मोहिमेची माहिती दिली आणि मोहिमेदरम्यान कोणत्याही गोष्टीची गरज असल्यास फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले. आ. महेंद्र थोरवे हे देखील मोहिमेत सहभागी झाल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला.

Exit mobile version