नऊ महिन्यांत 147 मातांनी दिला अर्भकांना जन्म
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासह सुरक्षेचा गाजावाजा महिला व बाल विकास विभागामार्फत कायमच करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये बाल विवाहाने थैमान घातले आहे. यामध्ये नऊ महिन्यांत 147 अल्पवयीन मातांची प्रसूती झाल्याची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, रायगडला अल्पवयीन प्रसूतीचे संकट निर्माण झाले आहे. रायगडच्या आदिती तटकरे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत, त्यामुळे या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेने रायगड जिल्ह्याकडे एक सुशिक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. कायद्याचे पालन करण्याबरोबर वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये रायगड जिल्ह्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे. कायद्यानुसार मुलींसाठी किमान विवाह वय 18 वर्षे आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात विशेष करून आदिवासी भागांमध्ये 14 ते 17 वर्षे वयोगटातील मुलींचे लग्न लावले जात असल्याचे बोलले जात आहे. मुलींच्या सुरक्षेची भीती व्यक्त करण्याबरोबरच सामाजिक दबाव, अंधश्रद्धा आदी कारण दाखवून मुलींचे लग्न लावले जाते. त्यामुळे लहान वयातच माता बनण्याची वेळ या अल्पवयीन मुलींवर येते. बालविवाहामुळे अल्पवयीन मुलींवर शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम, आई व बाळाच्या आरोग्याला गंभीर धोका, शिक्षण अर्ध्यातून सोडण्याची वेळ, आयुष्यभर आर्थिक व सामाजिक दुर्बलतेचा धोका उद्भवतो. रायगड जिल्ह्यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 147 अल्पवयीन मुलींची (माता) प्रसूती झाली असल्याची माहिती उघड झाली आहे. ग्रामपातळीवर असलेल्या यंत्रणेकडून जागरुक व जबाबदारपणे अंमलबजावणी केली जात नाही. त्याचा परिणाम बालविवाह होण्याचे संकट वाढत आहे. त्यामुळे महिलांसाठी असलेल्या शासनाच्या योजना फक्त कागदावर अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा जोर धरत आहे.
बालविवाहप्रकरणी 25 गुन्हे
रायगड पोलीस दलाच्या हद्दीतील 13 पोलीस ठाण्यांमध्ये बालविवाहप्रकरणी 25 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये तळा पोलीस ठाण्यात चार, रोहामध्ये तीन, कोलाड, वडखळ, पोयनाडमध्ये प्रत्येकी दोन, पाली, मांडवा सागरी, म्हसळा, रसायनी, मुरूड, अलिबाग, नागोठणे, महाडमध्ये प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अल्पवयीन प्रसूती झालेल्या मातांवर दृष्टीक्षेप
| महिना | प्रसूती संख्या | |
| जानेवारी | 21 | |
| फेब्रुवारी | 12 | |
| मार्च | 15 | |
| एप्रिल | 15 | |
| मे | 21 | |
| जून | 14 | |
| जुलै | 12 | |
| ऑगस्ट | 16 | |
| सप्टेंबर | 21 | |
| एकूण | 147 |
बालविवाहाचे प्रकरण आदिवासी दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. शिक्षणाचा अभाव, सामाजिक भान या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांनी मिळून यावर अधिक चांगले काम केल्यास बालविवाह रोखण्यास मदत होईल.
–आंचल दलाल,
जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड
