रायगड ग्रा.पं. निवडणूक! प्रशासन सज्ज; अधिकारी केंद्राकडे रवाना

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 5) मतदान होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यावर आला आहे. उद्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक अधिकारी निवडणूक केंद्राकडे रवाना झाले आहेत.

210 पैकी 38 सरपंच तर 1 हजार 854 पैकी 565 सदस्य हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे 168 सरपंच तर 1291 सदस्य पदाच्या जागेसाठी रविवारी मतदान होणार आहेत. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने बिनविरोध सरपंच, सदस्य विजयी झाले आहेत.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पद, तर काही ठिकाणी सरपंचपदाची जागा बिनविरोध झाल्या आहेत. जाहीर प्रचाराची सांगता शुक्रवारी (दि.3) झाली.
ग्रामपंचायत मतदानासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

Exit mobile version