| नेरळ | प्रतिनिधी |
रायगडात भाजपने विविध पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतले खरे, पण आता पक्षाची अवस्था उपरे वाढले आणि निष्ठांवत दुरावले अशी झाली आहे. नुकत्याच झालेल्या बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमात ते प्रकर्षाने दिसून आले.
कर्जत तालुक्यात वर्चस्व मिळविण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न होत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती नाही असे घडले आहे. त्यामुळे भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही असेच म्हणावे लागेल. दरम्यान, भाजपच्या जुने आणि जेष्ठ कार्यकर्त्यांनी खुद्द पक्षाचे मंत्र्यांच्या कार्यक्रमापासून दूर रहाण्याचा घेतला निर्णय कोणत्या दिशेला भाजपाची वाटचाल सुरु आहे यावर विचार विनिमय करायला लावणारी आहे.
दहा वर्षांपूर्वी भारतीय जाणत पक्ष कर्जत तालुक्यात अगदी ठराविक गावात दिसून यायचा. त्यामुळे भाजपचे तालुक्यातील कार्यकर्ते देखील मोजकेच आणि नजरेस भरून येणारे होते. मात्र गाव तेथे आपली शाखा किंवा शत प्रतिशत भाजपचा नारा देण्यात आला आणि भाजपचे कार्यकर्ते गावोगावी दिसून येऊ लागले. त्याच्यातही प्रत्येक बूथमध्ये भाजपचा बूथप्रमुख असलाच पाहिजे या अट्टाहासात तालुक्यात भाजप मध्ये दररोज कार्यकर्त्यांचे प्रवेश मधल्या काळात झाले आहेत. त्या त्या प्रवेशाचे वेळी कर्जत तालुक्यातील भाजप एकसंघ दिसून यायची. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील दुसर्या क्रमांकाचा मोठा पक्ष प्रवेश सोहळा कर्जत येथे पार पडला. त्यावेळी भाजपचे एक दोन जुने कार्यकर्ते पदाधिकारी हे व्यासपीठावर दिसून आले. पक्षात मागील चार पाच वर्षात अन्य राजकीय पक्षातून प्रवेशकर्ते झालेले कार्यकर्ते हेच पहिल्या रांगेत दिसून येत होते. हा बदल सर्वांना ठळकपणे दिसून येत होता.
माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्वाधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शेळके हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात किमान 400 हुन अधिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला आहे. त्या प्रवेश सोहळ्यामधून भारतीय जनता पक्षाला तालुक्यातील सर्व बूथ वर कार्यकर्ते मिळाले आहेत. मात्र त्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला भाजप वाढविणारे किती कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते याकडे राजकीय विश्लेषक लक्ष वेधून घेत आहेत. पाच वर्षे आणि त्यापेक्षा जुन्या भाजप कार्यकर्ते यांच्यापैकी जेमतेम दोन चार जण व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी या व्यासपीठावर पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, पक्षाचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप किसान मोर्चा प्रदेश पदाधिकारी सुनील गोगटे, भाजप महिला मोर्चा प्रदेश पदाधिकारी कल्पना दास्ताने, कर्जत नगरपरिषद उपाध्यक्ष अशोक ओसवाल, तालुक सरचिटणीस यांच्या सारखे असंख्य पदाधिकारी यांचा वावर त्या व्यासपीठावर दिसला नाही. विविध सेल चे पदाधिकारी हे देखील त्या प्रवेश सोहळ्यापासून का दूर राहिले यावर भाजप मधून काहीही प्रतिक्रिया दिली जात नाही. मात्र भाजप मध्ये जुना नवीन हा वाद वाढत चालला असून नवीन कार्यकर्ते हेच पदाधिकारी झाल्याने जुन्या कार्यकर्त्यांना ते विश्वासात घेत नसल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कडून दिली जात आहे.
यावर नेरळ येथील भाजपचे 30 वर्षांपासूनचे कार्यकर्ते पंढरीनाथ हजारे यांनी जुने कार्यकर्ते आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना फाट्यावर मारतात अशी कडक प्रतिक्रिया दिली आहे. यावर भाजप नेतृत्व काय भूमिका घेणार याकडे जुन्या नव्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.