रायगड पोलिसांचे महामार्गावर पेट्रोलिंग

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांमार्फत कायदा हातात घेतला जात असल्याने रायगड पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आतापर्यंत 51 जणांवर बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

महामार्गावरील सुरु असणाऱ्या कामामध्ये बाधा येऊ नये, यासाठी या महामार्गावरील रायगड पोलिसांच्या हद्दीत एक पोलीस अधिकारी आणि दहा शिपाई सतत पेट्रोलींग करत आहेत. त्यामुळे कामे बंद होणार नाहीत शिवाय बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना चाप बसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी पनवेल येथे मनसेच्या मेळावा पार पडला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महार्गाच्या दुरावस्थेबाबत सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. नागरिकांना त्रास न होता आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर तातडीने मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर गांधीगीरीच्या माध्यमातून आंदोलन केले, तर काही ठिकाणी आंदोलकांनी खळ्ळखट्याक स्टाईलने दणका दिला होता.

याप्रकरणी रायगड पोलिसांनी 51 जणांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यात काहीच दिवसांवर रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घटना घडल्या आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि आंनदाने राहावे, असे आवाहन सोमनाथ घार्गे यांनी केले. जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाच स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरसीपी प्लाटून तैनात केले आहेत.

Exit mobile version