नागोठण्यापासून डांबरीकरण सुरु
| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या नागोठणे पासून डांबरीकरणाच्या कामाला शनिवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, या टप्प्याचे काँक्रिटीकरणाचे कामही मे महिन्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थापक मॅनेजर यशवंत घोटकर यांनी प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांना दिले असल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती खांबे यांनी दिली आहे.
रखडलेल्या कामाबाबत आणि कासू ते इंदापूर दरम्यान रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत पडलेले खड्डे भरून डांबरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा एक मे रोजी रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे पत्र राष्ट्रीय महामार्गाला दिले होते. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनाही एक मे रोजी करण्यात येणार्या आंदोलनाबाबत पत्र देण्यात आले होते.
कासू ते इंदापूर या टप्प्यातील रस्त्याची अनेक ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. नागोठणे ते पळस -कोलेटी दरम्यान वाहन चालवणे जिकरीचे होते, या रस्त्याची एकबाजू पूर्णपणे उध्वस्त झालेले असल्याने वाहनचालक विरुद्ध मार्गिकेने वाहने हाकतात, त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले परंतु ज्या ठिकाणी रस्ता चांगला आहे त्या शिरढोण पनवेल येथे कामाला सुरुवात झाली. कासू ते इंदापूर दरम्यान रस्त्याचे काम आधी करणे गरजेचे असताना या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. रायगड जिल्हा प्रेस क्लबने आंदोलनाचा इशारा देऊन नागोठणे बाजूने काम सुरू करावे यासाठी प्राधिकरणाकडे तगादा लावला होता.
नागोठणे-कासू पासून खड्डे पडलेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. तसेच काँक्रीट करण्याच्या मशिनरीही सुकेळी खिंडीमध्ये आणून ठेवल्या असून पहूर येथे कॉरीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे कामही लवकरच सुरू होईल आणि हे काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यातही सुरू राहील अशी माहिती घोटकर यांनी दिली.