| धाटाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा हा कोकणात जाणारा महामार्ग चार पदरी सुसज्ज रस्ता व्हावा, यासाठी रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून गेले 17 वर्ष अनेक आंदोलने उभारली आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने लढा दिला. सध्या परिस्थितीत रस्त्याचे काम बऱ्यापैकी झालेले असले, तरी अजून तरी हा रस्ता पूर्णत्वास आलेला नसताना, अनेक ठिकाणी कामे सुरू असताना तसेच अधिकृत उद्घाटन झालेले नसताना या मार्गावर भारतीय राष्ट्रीय राज्य प्राधिकरण विभागाने टोल वसुली सुरू केली आहे. ही टोल वसुली तात्काळ बंद करावी, या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली येथील पनवेल कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी विजय मोकल, अनिल भोळे, भारत गोरेगावकर, रवींद्र मोरे, दिनेश सुतार, प्रशांत शेडगे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ही टोलवसुली तात्काळ थांबवावी, अन्यथा रायगड प्रेस क्लब टोल नाक्यावर आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
