रायगडच्या विद्यार्थ्यांची थेट इस्रोवारी

| नागोठणे | प्रतिनिधी |

कोल्हापूर गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यावेळी जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांची थेट इस्रो भेटीसाठी निवड झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण 3,617 विद्यार्थ्यांमधून रायगडच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्याने रायगड जिल्ह्याचा शैक्षणिक डंका राज्यभर झाला आहे.

गुरुकुल एज्युकेशन सोसायटी ही संस्था इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंत मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी 2011 पासून स्पर्धा परीक्षा आयोजित करत आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच ही परीक्षा अशोक अहिरे यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. यासाठी पोलादपूर, कर्जत, खोपोली, उरण, खारघर ते पनवेलपर्यंत सातत्याने दौरे करून शिक्षक व पालकांमध्ये स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले. परिणामी, संपूर्ण रायगड जिल्ह्यातून तब्बल 3617 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दि.25 जानेवारी रोजी झालेल्या स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्यातून प्रथमच चार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर विशेष यश मिळवत इस्रो भेटीसाठी निवड मिळवली आहे. त्यात सार्थक मान (सीकेटी, न्यू पनवेल), विनीत कापसे (द.ग. तटकरे, कोलाड), साई म्हात्रे (रजिप पिगोंडे शाळा, नागोठणे) आणि शुब्रा शिंदे (ग.बा. वडेर हायस्कूल, पाली) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Exit mobile version