रायगडचे पर्यटन बहरले

रस्त्यांवर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूकीची कोंडी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
होळी, धुलीवंदन आणि शनिवार रविवार असे सलग लागोपाठच्या सुट्ट्यांमुळे रायगड जिल्ह्यातील अलिबागसह सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या गर्दी झाल्याने जिल्ह्याचे पर्यटन बहरले आहे. गतवर्षी होळी सणावर लॉकडाऊनचे सावट असल्याने जल्लोषावर पाणी फेरले होते. यंदा मात्र ही कमी भरुन काढण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी सुरू केली आहे. त्यामुळे गुरुवार पासूनच जिल्ह्यातील पर्यटन स्थळे भरभरून गेली आहेत. चाकरमानी आणि पर्यटकांची पावले कोकण आणि रायगड जिल्ह्यातील गावांकडे वळू लागल्याने मुंबई-पुणे दृतगती मार्गावर वाहनांची तुफान गर्दी कायम असून, वाहतूक कोडीं झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

होळीच्या पार्श्‍वभुमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवीमुंबई परीसरातील नागरिक घराबाहेर पडले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. खालापूर टोल नाका लोणावळा दरम्यान घाट परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अत्यंत धिम्या गतीने या परिसरात वाहनांची वर्दळ सुरु होती. त्यामुळे पुण्याच्या दिशेला जाणार्‍या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन सुरु होते.

सणाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक रायगडात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची भरती आली असून धूम मस्ती करताना पर्यटक दिसत आहेत. अलिबाग तालुक्यातील मांडवा, किहीम, आवास, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरुड, त्याचप्रमाणे श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्‍वर आदी सगळेच समुद्रकिनारे बहरले आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक गड, किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भाव राज्यात कमी झाला असल्याने जिल्ह्यातही निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यवसायाला चांगली तेजी आल्याने पर्यटनाभिमुख व्यवसायीकांच्या चेहर्‍यावर हसू दिसू लागले आहे. पर्यटक मोठ्या संख्येने आले असल्याने हॉटेल, कॉटेज ही हाऊसफुल झाले आहेत.

Exit mobile version