रायगडचे वाहतूक पोलीस हायटेक

दंड वसुली होणार जागेवरच

| अलिबाग | प्रतिनिधी |

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करताना त्यांना जागेवरच वसूलीची पावती देता यावी यासाठी अद्ययावत अशी मशीन उपलब्ध झाली आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे कामकाज हायटेक होऊ लागल्याने आता दंडात्मक कारवाईचे काम जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारित जिल्हा वाहतूक शाखा कार्यरत आहे. या शाखेमध्ये पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सुमारे 90 पोलीस कर्मचारी काम करीत आहेत. वाहन वेगात चालविणे, हेल्मेट न वापरणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, टीबल शीट असणे अशा अनेक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतुक पोलीसांद्वारे कारवाई करून बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी आता वाहतूक पोलीस हायटेक होण्याच्या मार्गावर आहेत. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी एक अद्ययावत मशीन उपलब्ध झाले आहे. एकूण 60 मशीन जिल्हा वाहतूक शाखेला प्राप्त झाल्या आहेत. या मशीनमध्ये मागील थकीत दंडाची माहिती येत असून जागेवरच दंड वसुलीची पावती दिली जात आहे. या अद्ययावत मशीनमुळे दंड भरण्यासाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याचा वेळ कमी झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून या मशीन जिल्हा वाहतूक शाखेकडे दखल झाल्या आहेत. त्या मशीनमार्फत दंड वसूलीचा बडगा वाहतूक शाखेने सुरु केला आहे. यातून जागेवर थकीत दंड वसुलीदेखील होत असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.

Exit mobile version