देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन शनिवारी (दि. 15) जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सकाळी साडेसातपासून नऊ वाजेपर्यंत विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. अलिबाग पोलीस मुख्यालयात सकाळी 9.05 वाजता रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्य ध्वजारोहण होणार आहे. यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात येणार असून, देशभक्तीपर कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते, तर जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्येही ध्वजारोहण केले जाणार आहे. शाळा-महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीपर गीत, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध व वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बलिदानाची गाथा नव्या पिढीपर्यंत
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटनांकडून देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची गाथा आणि देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमांतून दिला जाणार आहे.
Exit mobile version