खुशखबर! रायगडकरांना 8 हजारांची रेती मिळेत फक्त 600 रुपयांत

रायगड जिल्ह्यात नऊ डेपोंवर मिळणार रेती
नद्या, खाड्यांमधील 18 वाळू गटांमधून करणार वाळूचे उत्खनन
रेती डेपोंमध्ये 17 लाख 46 हजार ब्रास रेतीचा असणार साठा

| रायगड | प्रतिनिधी |

राज्य शासनाच्या रेती धोरणानुसार रायगड जिल्ह्यातील वाळूघाट डेपोची ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील पर्यावरण संमती प्राप्त रेती घाटाकरिता नऊ ठिकाणी डेपो निश्चित करण्यात आले आहेत. महाखनिज प्रणालीवर आधार क्रमांकासह नोंदणी केल्यानंतर नागरिकांना रेती उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सावित्री नदी, कुंडलिका नदी, अंबा नदी, बाणकोट खाडी, रेवदंडा खाडी, राजापुरी खाडी, धरमतर खाडीमधील 18 वाळू गटांमधून तब्बल 17 लाख 46 हजार 277 ब्रास रेती जिल्ह्यातील नऊ डेपोंमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या नागरिकांना प्रति ब्रास रेतीसाठी जवळपास 8 ते 10 हजार रुपये मोजावे लागत आहेत. मात्र नवीन रेती, वाळू धोरणानुसार सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आला आहे.

रेतीबाबतची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन रेतीघाटांसह डेपोंचा ताबा यशस्वी निविदाधारकास देण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांनी मागणी नोंदविल्यानुसार या डेपोवरून रेती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महाखनिज प्रणालीवर आधार क्रमांकासह नोंदणी करणे आवश्यक आहे. सेतू केंद्रामार्फतही नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. मागणी नोंदविल्यानंतर 15 दिवसांच्या आत डेपोमधून रेती घेऊन जाणे ग्राहकांवर बंधनकारक असेल. एका कुटुंबास एका वेळी कमाल 50 टन रेती देय आहे. त्यानंतर वाढीव रेती हवी असल्यास ती मिळाल्याच्या तारखेपासून एका महिन्यानंतर रेतीची मागणी करता येणार आहे.

जिल्हा प्रशासनांच्या खनिकर्म विभागाने प्रसिध्द करण्यांत आलेल्या ई-निविदेच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी, रेवदंडा खाडी व सावित्री नदी, बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी, राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रातील सागरी किनारपटटी क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिकी पध्दतीने ड्रेजरव्दारे वाळू, रेतीचे उत्खनन करण्यात येणार आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या योग्य वाळूची डेपोपर्यंत वाहतूक करणे, वाळू डेपोवरील वाहनांमध्ये पुन्हा वाळू भरणे, वाळू डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करणे याकामी रायगड जिल्ह्यातील नद्यांवर 18 वाळू गट निश्चित करण्यात आले असून नऊ रेती डेपो निश्चित काण्यात आले आहेत.

जिल्ह्यात नऊ ठिकाणी रेतीडेपो निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये पेण तालुक्यातील गांधे येथे येथे रेती डेपोमध्ये 14 हजार 854 ब्रास रेतीचा साठा असणार आहे. पेण तालुक्यातील वावे येथील रेती डेपोमध्ये 66 हजार 702 ब्रास रेती साठा असणार आहे. रोहा तालुक्यातील शेडसई येथील रेती डेपोमध्ये 1 लाख 60 हजार 967 ब्रास रेती साठा असणार आहे. रोहा तालुक्यातील कांडणेखुर्द येथे असणाऱ्या डेपोमध्ये 1 लाख 78 हजार 920 ब्रास रेती साठा करण्यात येणार आहे.

महाड तालुक्यातील केम्बुर्ली येथील रेती डेपोमध्ये 1 लाख 11 हजार 949 ब्रास रेतीचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाड तालुक्यातील चांभारखिंड येथील डेपोमध्ये 1 लाख 86 हजार 203 ब्रास रेतीचा साठा करण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील भोनंग येथील रेती डेपोमधून 6 लाख 3 हजार 819 ब्रास रेतीसाठा साठविण्यात येणार आहे. रोहा तालुक्यातील शेडसई, गोफण येथील रेती डेपोमध्ये 3 लाख 93 हजार 869 ब्रास रेती उपलब्ध असणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दांडा येथील रेती डेपोमध्ये 1 लाख 32 हजार 15 ब्रास रेती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नवीन रेती, वाळू धोरणानुसार सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आला आहे. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करून ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात नऊ रेती डेपो निश्चित करण्यात आले आहेत. या रेती डेपोमधून आता रायगडकरांना बांधकामासाठी रेती उपलब्ध करून दिली वाजणार आहे.

मनोज मेश्राम, जिल्हा खनिकर्म अधिकारी

Exit mobile version