रायगडकरांनो सावधान! चार दिवस धोक्याचे

| रायगड | प्रतिनिधी |
गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत. हवामान विभागाने 4 जुलै ते 7 जुलै या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चार दिवसामध्ये रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरडग्रस्त, नदी आणि खाडी किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

सतत बरसणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. महाड, पेणमध्ये दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून पावसामुळे वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या दिवसभरात रायगड जिल्ह्यात 40. 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले असले तरी त्याची तीव्रता अधिक असल्याने रायगड जिल्ह्यात विविध दुर्घटनांची नोंद आहे. जिल्ह्यामध्ये 24 जूनपासून आत्तापर्यंत 167 मिमि. पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून त्याचा फटका किनाऱ्यालगतच्या गावांना बसला आहे. यात पेणमधील खाडीलगत असलेली सागरीवाडी, अष्टविनायकवाडी, विठठलवाडीतील 47 कुटूंबांतील 185 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. पेणमधील दूरशेत येथील दरडग्रस्त गावातील सहा कुटुंबांमधील 18 नागरिकांना तर मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील दरडग्रस्त गावातील 9 कुटुंबांतील 40 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

दोन नद्या इशारा पातळीवर
रोहा तालुक्यातील कुंडलिका, अंबा, महाडमधील सावित्री, पनवेलमधील पाताळगंगा, गाढी तर कर्जतमधील उल्हास या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. या नद्यांमध्ये सध्या पावसाचे पाणी वाढू लागले आहे. कुंडलिका नदीत सध्या 22.40 मीटर , पाताळगंगा नदीत 18.70 मीटर इतका जलसाठा असून इशारा पातळीच्या मार्गावर आहे.

Exit mobile version