रायगडच्या बांगलादेशी विशेष पथकाची कारवाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील इंदापूर गावातून दोन बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडच्या बांगलादेशी विशेष पथकाने ही कारवाई केली. दोघेही दाम्पत्य असल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले आहेत. या प्रकल्पांमध्ये कामानिमित्त वेगवेगळ्या राज्यांतून कामगार येत आहेत. नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्यात ही मंडळी राहात आहेत. त्याचाच फायदा घेत काही बांगलादेशी जिल्ह्यात घुसखोरी करून राहात असल्याची समोर आली आहे. माणगाव तालुक्यातील इंदापूर गावात सहकार नगरमधील दळवी चाळीत बांगलादेशी बेकायदेशीररित्या राहात असल्याची माहिती बांबलादेशी विशेष पथकाला मिळाली.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघमोडे, सहाय्यक फौजदार संजय ठाकूर, पोलीस हवालदार कल्पेश टेमकर, महिला पोलीस हवालदार रसिका तुषार, पोलीस शिपाई श्रेयश म्हात्रे या बांगलादेशी विशेष पथकाने बुधवारी (दि. 13) छापा टाकला. या छाप्यात माझिदा आलम आणि रसेल हुसेन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर ते बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी चोरट्या मार्गाने घुसखोरी करून भारतात प्रवेश केला. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर गावात एका चाळीमध्ये चार महिन्यांपासून राहात होते. गवंडी, मेस्त्रीच्या हाताखाली काम करत होते. त्यांची लवकरच बांगलादेशामध्ये रवानगी केली जाणार आहे.
