रायगडच्या पणत्यांचा प्रकाश अमेरिकेत

मतिमंद मुलांनी बनविल्या हजारो पणत्या
| पनवेल | राजेश डांगळे |
सध्या सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू आहे. दिवाळीमध्ये कंदील, फराळ, फटाक्यांना महत्त्व असते, तितकेच महत्त्व पणत्यांनादेखील असते. या पणत्यांची के्रझ जशी आपल्याकडे आहे, तशीच काहीशी के्रझ अमेरिकेतदेखील आहे. यंदा अमेरिकेत आई डे केअर संस्थेच्या मतिमंद मुलांनी बनवलेल्या पणत्या मागवल्या गेल्या असून, या पणत्यांची चर्चा सध्या सुरू आहे.

मतिमंद मुलांकडे बघण्याचा काही लोकांचा दृष्टीकोन वेगळा असतो. ही मुले काहीच करू शकत नाही, अशी अनेकांची भावना असते. मात्र, आई डे केअर संस्था, पेणमधील मतिमंद मुलांनी साकारलेल्या पणत्यांची चर्चा सध्या सातासमुद्रापार आहे. आई डे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र, पेण येथील मुलांना शैक्षणिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावरही भर दिला जातो आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याचे शिक्षण दिले जाते.

संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. शिल्पा ठाकूर यांनी आपल्या मैत्रिणींबरोबरच अमेरिकेतसुद्धा या मुलांनी बनविलेले प्रॉडक्ट्स पाठविले. संजय ठाकूर, संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू घेण्यासाठी आपल्या मित्रांना तसेच परिचितांना प्रवृत्त केले आणि आपल्या राहण्याच्या ठिकाणी स्टॉलही उपलब्ध करून दिले. संस्थेचे सचिव अ‍ॅड. सतीश म्हात्रे यांनी संस्थेतील दिवाळीचे साहित्य कोर्टात नेऊन विक्रीसुद्धा केले आहे. संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील यांनी स्वतः जाऊन पुण्यापर्यंत स्टॉल लावलेले आहेत. सल्लागार डॉ. समिधा गांधी यांनी आपल्या क्लिनिकमध्ये आणि सोसायटीमध्ये प्रदर्शन लावले. विद्या खराडे, वंदना पवार, मनोज मिस्त्री, अविनाश ओक, मिस्टर बहिरा नीलिमा गडकरी, इनरव्हील क्लब ऑफ पेण संयोगिता टेमघरे, रोटरी क्लब ऑफ पेण या सर्व लोकांच्या मेहनतीबरोबरच संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षक, इतर कर्मचारी वृद्ध यांनी मेहनत घेतली आहे.

यंदा 20 हजार पणत्यांची निर्मिती
दिवाळीच्या या आनंददायी सणानिमित्त संस्थेतील विद्यार्थ्यांनी जवळजवळ 20 हजार पणत्या तयार केल्या असून, जवळजवळ 5000 फ्लोटिंग कँडल्स तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी अनेक कंपन्यांनी तसेच संस्थेच्या विश्‍वस्तांनी विविध ठिकाणी स्टॉल लावण्याच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली.

सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही मुलांना पाच-पाच हजार रुपयांपर्यंत मानधन देऊ शकत आहोत. यापुढेही आपले संस्थेच्या कार्यात योगदान असू दे, आमच्या मुलांनी बनविलेल्या वस्तू आपण खरेदी कराव्यात, यातून मिळालेल्या नफ्यातून आपण आपल्या मुलांना अगदी दहा हजार रुपयांपर्यंत मानधन देऊ शकतो.

– स्वाती मोहिते, संचालिका आई डे केअर संस्था, पेण
Exit mobile version