डॉ. संदेश पाटील यांना मिळाला पहिला मान; वाशी मार्केटमध्ये 9 पेट्या दाखल
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या हंगामाची यंदा नोव्हेंबर महिन्यातच चाहूल लागली असून, रायगडच्या हापूस आंब्याने थेट मुंबईच्या बाजारपेठेत दमदार एन्ट्री केली आहे. अलिबाग तालुक्यातील जांभूळपाडा येथील आंबा बागायतदार डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या तब्बल 9 पेट्या वाशी येथील घाऊक आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, रायगड जिल्ह्यातून मुंबईच्या बाजारपेठेत यंदाचा पहिला हापूस आंबा पाठविण्याचा मान डॉ. संदेश पाटील यांना मिळाला आहे. प्रत्येक पेटीत दोन डझन आंब्यांचा समावेश असून, या पहिल्याच आवकेमुळे रायगडच्या आंबा बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील हापूस आंब्याची देशभरात वेगळी ओळख आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातही उत्तम दर्जाचा, चवदार आणि गुणवत्तापूर्ण हापूस आंबा उत्पादित होत असून, रायगडचा हापूस कोणत्याही बाबतीत मागे नाही, असा ठाम विश्वास डॉ. संदेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या हापूससोबत आता रायगडचा हापूसही मुंबईच्या बाजारपेठेत आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. अलिबागच्या जांभूळपाड्यातून वाशी मार्केटपर्यंत पोहोचलेली ही पहिली खेप रायगडच्या आंबा हंगामासाठी नवी आशा घेऊन आली आहे. रायगड जिल्ह्यातील हापूस आंब्याचे महत्त्व, त्याची गुणवत्ता आणि चव यांना मोठ्या बाजारपेठेत अधिक ओळख मिळावी, यासाठी स्थानिक आंबा उत्पादक शेतकरी सातत्याने प्रयत्नशील आहेत. याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून डॉ. पाटील यांनी आपल्या बागेतील पहिली खेप मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये पाठवली आहे. या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळावी, स्थानिक बागायतदारांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळावा आणि रायगडच्या हापूसची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
रायगडच्या बागायतदारांसाठी नवी आशा
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच अलिबागच्या हापूस आंब्याची वाशी मार्केटमध्ये झालेली आवक ही रायगडच्या आंबा उत्पादकांसाठी उत्साहवर्धक बाब मानली जात आहे. पहिल्या खेपेला बाजारपेठेत किती भाव मिळतो, याकडे आता आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे. या पहिल्या आवकेमुळे आगामी हंगामातील बाजारभाव आणि मागणीबाबतही उत्सुकता वाढली आहे.
हापूस आंब्याचे दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी वर्षभर बागेची योग्य निगा राखणे, झाडांचे व्यवस्थापन करणे आणि आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे असते. तसेच, रायगडच्या हापूस आंब्याला बाजारपेठेत योग्य स्थान आणि स्वतंत्र ओळख मिळाली पाहिजे. स्थानिक आंबा उत्पादकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तेवर अधिक भर दिल्यास रायगडचा हापूस केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील बाजारपेठांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो.
डॉ. संदेश पाटील,
आंबा बागायतदार, जांभूळपाडा
