रायगडच्या हापूसचा अमेरिकेत डंका

डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतील आंबा सातासमुद्रापार

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

बदलते हवामान, उत्पादन घट आणि बाजारातील भेसळयुक्त आंब्यांच्या समस्यांना तोंड देत रायगडच्या हापूसने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा आपली छाप उमटवली आहे. जांभूळपाडा येथील आंबा बागायतदार डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतील हापूस थेट अमेरिकेत पोहोचल्याने बागायतदारांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.

“फळांचा राजा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील हापूस आंब्यापुढे यंदा मोठी आव्हाने उभी ठाकली असतानाही रायगड जिल्ह्यातील बागायतदारांनी जिद्दीने मार्ग काढत आपला दर्जा कायम ठेवला आहे. बदलत्या हवामानाचा फटका, अवकाळी पाऊस, वाढता तापमानाचा प्रभाव, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील भेसळयुक्त आंब्यांची वाढती विक्री या सगळ्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा कठीण परिस्थितीतही जांभूळपाडा येथील आंबा बागायतदार डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतील हापूस आंब्याने थेट अमेरिकेची बाजारपेठ गाठत रायगडच्या हापूसचा डंका पुन्हा एकदा जगभरात वाजवला आहे. या यशामुळे स्थानिक बागायतदारांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. मात्र, वास्तव चित्र चिंताजनक आहे. यंदा मोहोर मोठ्या प्रमाणात टिकला नाही. तापमानातील चढ-उतार आणि आर्द्रतेतील बदलामुळे फळधारणा कमी झाली. मावा आणि तुडतुडे यांसारख्या किडींमुळे बागांचे नुकसान झाले. त्याचबरोबर खतं, औषधं, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, यंदा केवळ 15 ते 20 टक्के उत्पादन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्ह्यात सुमारे 56 ते 60 हजार आंबा बागायतदार असून, संपूर्ण कोकणात ही संख्या साडेचार लाखांच्या आसपास आहे. हापूस हा केवळ एक फळ नसून, कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, सध्याच्या संकटामुळे हा कणा डळमळीत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, बाजारात कर्नाटकातून येणाऱ्या भेसळयुक्त आंब्यांची विक्री हापूसच्या नावाखाली होत असल्याने ग्राहकांचा विश्वास कमी होत आहे. यावर उपाय म्हणून अनेक ग्राहक आता थेट बागायतदारांकडून आंबे खरेदी करण्याकडे वळत आहेत.

यंदा हवामानामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. मोहोर टिकला नाही आणि उत्पादन घटले, पण खर्च मात्र वाढतच गेला. याशिवाय बाजारात भेसळयुक्त आंबे विकले जात असल्याने आमच्या खऱ्या हापूसला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून आंबे खरेदी करून आम्हाला आधार द्यावा. तसेच बागायतदारांनीही खर्च नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला, तरच या व्यवसायात टिकून राहता येईल.

डॉ. संदेश पाटील,
आंबा बागायतदार
Exit mobile version