राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केले अजिंक्यपद
| रोहा | प्रतिनिधी |
पंजाब येथे संपन्न झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत ओम साई राम सानेगाव खो-खो क्लब रोहा रायगड संघाने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत, अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत हरियाणा आणि पंजाब राज्यांचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. तर, अंतिम सामन्यात आंध्र प्रदेश राज्याचा पाच गुणांनी पराभव करीत राष्ट्रीय स्तरावर अजिंक्यपद प्राप्त केले आहे.
ओम साई राम सानेगाव खो-खो क्लब रोहा रायगड संघाने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावून रोहा तालुका, रायगड जिल्ह्यासह आपल्या महाराष्ट्र राज्याचे नाव रोशन केले आहे. तर, नुकतेच पुणे येथे संपन्न झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद मिळविले होते.
या संघामध्ये अनिरुद्ध जवरत, साहिल जाधव, हितेश चंदणे, प्रतिक जंगम, मितेश मढवी, यश चोगले, हर्षल कोस्तेकर, कुशल मोरे, राज शेलार, रितेश गोवर्धने, पियुष महाडिक, ऋतिक मोहिते, विघ्नेश शेळके, कार्तिक मुक्तीपाड या खेळाडूंची निवड करण्यात आली होती. तर, सानिका जगदीश वाघमारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर विजेतेपदाचा बहुमान पटकावल्याने संघातील सर्वच खेळाडूंचे क्रीडाप्रेमी नागरिक व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून अभिनंदन व्यक होताना दिसत आहे.