| माणगाव | प्रतिनिधी |
सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध गझलकार प्रा.नागेश नायडू (नायाब) यांनी आपल्या धारदार लेखणीने आणि खणखणीत सादरीकरणाने गझल कट्टा गाजवला. सामाजिक विषमता, लोकशाहीची घसरण आणि मानवी वेदना यांवर परखड भाष्य करणाऱ्या त्यांच्या आशयघन गझलांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर खोल ठसा उमटवला.
रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील कै. द. ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. नागेश नायडू गेली 25 वर्षे अध्यापनाचे कार्य करत आहेत. ‘नायाब’ या तखल्लुसाने त्यांनी मराठी गझलविश्वात स्वतःची स्वतंत्र आणि ठळक ओळख निर्माण केली आहे. साताऱ्याच्या गझल कट्ट्यावर सादर झालेल्या त्यांच्या गझलांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. बदलत्या काळातील विसंगती अधोरेखित करताना त्यांनी सादर केलेला शेर विशेष लक्षवेधी ठरला. आयुष्याचा पेपर म्हणजे चकवा असतो, उत्तर लिहिता प्रश्न अचानक बदलून जातो”. गरिबी आणि भुकेचे विदारक वास्तव मांडणाऱ्या खालील ओळींना रसिकांनी उभे राहून दाद दिली चंद्र अन् कोजागिरी हे तृप्ततेचे चोचले, भाकरीचा सूर्य गिळण्या अंतराळी चाललो… लोकशाहीवर ‘नायाब’ प्रहार राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे त्यांचे शेर विशेष चर्चेचा विषय ठरले – सत्याग्रहास माझ्या चिरडून ठार केले, गांधी मनात माझ्या गांधी खिशात तुमच्या, घासून पाय मेली लाचार लोकशाही, रडतेय हमसुनी ती शाई नखात तुमच्या… प्रा. नागेश नायडू हे सातत्याने अखिल भारतीय साहित्य संमेलन, ‘एल्गार’ मराठी गझल संमेलनसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठांवर रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या या दमदार सादरीकरणामुळे रायगडच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव झालयाची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.
साहित्य संमेलनात रायगडच्या ‘नायाब’ गझलांचा डंका
