। श्रीवर्धन । वर्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या श्रीवर्धन शाखेने रविवारी (दि.22) रायगड जिल्हा कवी संमेलन आणि गझल मुशायरा या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन पळधे केटरर्स यांच्या मंडपात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कवि उपस्थित होते. यात प्रामुख्याने कोमसाप रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ, समन्वयक अ.वि. जंगम, संजय गुंजाळ आदींचा समावेश होता. यावेळी श्रीवर्धन शाखेच्या अध्यक्षा सीमा रिसबूड, अनिता कांबळे, सुधीर शेठ, अ.वि. जंगम, वाचनालयाचे अध्यक्ष मनोज गोगटे यांनी मनोगत व्यक्त केली.
हा कार्यक्रम कवी संमेलन व गझल मुशायरा अशा दोन भागांत रंगला. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संजय गुंजाळ होते. कवी संमेलनात सर्वश्री गंगाधर साळवी, डॉ.शीतल मालुसरे, दिपक सकपाळ, श्रेयस रोडे, नागेश नायडू, वैशाली साळुंके, नेहा प्रधान, ॠद्धी भगत, निकिता भोसले, छाया गोवारी व नायब तहसिलदार भुर्के, भक्ती केळस्कर, आर्या कोसबे, मनोज गुरव, शुभम वाणी, सीमा रिसबूड, अनिता कांबळे, शर्मिला जोशी यांनी स्वरचित काव्य रचना सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नायडू यांनी केले.