कर्जतच्या संतोष दगडे फडकविला तिरंगा
| नेरळ | प्रतिनिधी |
जगातील सर्वात उंच शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. माऊंट एव्हरेस्ट सर करायला निघालेल्या जगातील 200 गिर्यारोहकांच्या पथकातील पहिली तुकडी बुधवारी 17 मे रोजी सकाळी पोहोचली. जगातील सात गिर्यारोहकांच्या पहिल्या तुकडीमध्ये भारतातील दोन गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले. यामध्ये कर्जत येथील गिर्यारोहक संतोष दगडे यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवत इतिहास घडविला.
1 एप्रिलपासून जगातील 200 गिर्यारोहक यांची तुकडी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या चढाईवर निघाले होते. त्यात भारत देशातील 15 गिर्यारोहक असून, या सर्व गिर्यारोहक यांच्यातील पहिली सात जणांची तुकडी बुधवारी 17 मे रोजी सर माऊंट एव्हरेस्टवर पोहोचली आहे. 1 एप्रिल पासून महारष्ट्र राज्यातील चार गिर्यारोहक हे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आपल्या देशातील अन्य प्रदेशातील मिळून 15 गिर्यारोहक यांना यावर्षी ही संधी मिळाली आहे. नेपाळ देशात असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर असून, या शिखराची उंची 8848.88 मीटर आहे. साधारण 45 दिवसांची ही मोहीम असते.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून नेपाळकडे प्रयाण केले. त्याआधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या माऊंट एव्हरेस्ट वीरांना शुभेच्छा दिल्या होत्या. रायगड कर्जत येथील संतोष दगडे, ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर येथील संदीप मोकाशी, हेमंत जाधव आणि धनाजी जाधव या चौघांनी एकाच वेळी प्रयाण केले होते. काही दिवस हिमालयातील हवामानात झालेले बदल यामुळे सर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघालेल्या गिर्यारोहकांची कोणतीही तुकडी बेस कॅम्प चार ते सर माऊंट एव्हरेस्ट या टप्प्यासाठी निघाली नव्हती. मात्र, 16 मे रोजी वातावरणात झालेला बदल पाहून रात्री बेस कॅम्प चार येथून सात गिर्यारोहकांची तुकडी सर माऊंट एव्हरेस्टकडे कूच करून निघाली आणि या तुकडीने अगदी सकाळच्या पहिल्या प्रहरी माऊंट एव्हरेस्ट सर केले. त्या पहिल्या तुकडीमध्ये जगातील सहा देशांचे सात एव्हरेस्ट वीर सहभागी होते. त्यात भारतातून निशा कुमारी आणि संतोष दगडे यांनी एव्हरेस्ट सर केले, तसेच 11 शेरप्पा यांनीदेखील एव्हरेस्ट सर केले असून, कर्जत रायगड येथील गिर्यारोहक संतोष दगडे यांना शेरपा मिंगमा कर्मा यांची या मोहिमेत साथ मिळाली.
तिरंगा डौलाने फडकला
माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर कर्जत येथून निघालेले गिर्यारोहक संतोष दगडे यांनी आपल्यासोबत हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो छापलेला झेंडा आणि त्याच्या वरच्या भागात भारताचा तिरंगा असा झेंडा एकत्र असलेले साहित्य सोबत नेले होते. तो झेंडा मानाने माऊंट एव्हरेस्ट शिखरावर रोवत झेंड्याला अभिवादन केले.
संतोष दगडे ट्विट…
सर्व मोहिमेमध्ये माझे अन्य तीन साथीदार हे आगामी काळात माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी जाणार आहेत, असे ट्विट संतोष दगडे यांनी केले आहे.