कार्यकारी अभियंता धायतडक यांचे बेजबाबदार उत्तर
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सहाण-पाल्हे-नागाव मार्गावरील पुलाचा संरक्षक कठडा रविवारी कोसळला. पुलाच्या कडेला असलेले संरक्षणच जमीनदोस्त झाले. याबाबत शेकापने आक्रमक भूमिका घेत बुधवारी (दि.1) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता मोनिका धायतडक यांची भेट घेत जाब विचारला. पुलाला अपघाताचा धोका स्पष्टपणे दिसत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी फक्त बॅरिकेड्स पडले आहेत, पुलाच्या मुख्य संरचनेला कोणताही धोका नाही, असा दावा केला. या भूमिकेने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरापासून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग करत होता. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्तीचा दर्जा काय होता, याचा नमुना कठडा कोसळल्यानेच समोर आल्याची टीका होत आहे. प्रत्यक्षात दुरुस्ती झाली की केवळ कागदोपत्री कामे झाली? असा सवाल शेकाप कार्यकर्त्यांनी उपस्थित करताच कठड्याचे काम पूर्वी करण्यात आल्याचे धायतडक यांनी सांगितले. ते काम आम्ही केले नसल्याचे सांगून त्यांनी जबाबदारी झटकल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, पुलाचा कठडा कोसळल्यानंतरही ‘काळजीचे कारण नाही’ असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त होत असून, कठडा नसलेला पूल सुरक्षित कसा, असा सरळ प्रश्न वाहनचालक आणि ग्रामस्थ विचारत आहेत. रात्रीच्या अंधारात या पुलावरून प्रवास करणाऱ्यांसाठी परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. प्रभावी बॅरिकेड्स नाहीत, पुरेशी प्रकाशयोजना नाही आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीही दिसून येत नाही. अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, पाल्हेसह नवेदर बेली पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत सतत शेतकरी कामगार पक्षाने बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून फक्त आश्वासनाचा पाऊस पाडण्यात आला आहे. डागडुजी फक्त नावालाच असे चित्र आहे. नवेदर बेली पुलाची अवस्थादेखील दयनीय झाली आहे. बांधकाम परिक्षणामध्ये हा पुल धोकादायक ठरला आहे. या पुलावरून अवजड वाहनाला गतवर्षी पावसाळ्या बंदी घातली. मात्र, पुलाच्या दुरुस्तीसह नव्याने बांधकाम करण्यामागे कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाही. या पुलावरून एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड हाल झाले आहेत. या पुलावर बॅरिकेट बसविण्याची मागणी करण्यात आली. परंतु, काम दिसून येत नाही. नियम धाब्यावर बसवून या पुलावरमात्र तीस ते चाळीस टन क्षमतेची अवजडन वाहने खुलीआमपणे धावतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाल्हे व नवेदर बेली पुलावरील प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप शेकापने केला आहे. पाल्हे व बेली पुलाची दुर्घटना घडल्यावर संबंधित विभाग, त्याला जबाबदार राहणार, अशी टीका करीत बुधवारी (दि. 1) शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांची भेट घेऊन पुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. जीर्ण झालेल्या पाल्हे व बेली येथील पुलाबाबत शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यावतीने शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप जिल्हा कार्यालयीन चिटणीस अनिल पाटील, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे आणि अलिबाग नगरपरिषदेचे पाणी सभापती अनिल चोपडा आदी उपस्थित होते.






