मोठमोठी भगदाडे, अपघाताची टांगती तलवार
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा-कोलाड मार्गावरील रोठ खुर्द व वरसे दरम्यानच्या पुलाच्या कठड्याला मोठमोठी भगदाडे पडल्याने हा पूल सध्या धोकादायक स्थितीत आला आहे. कठड्याची झालेली झीज पाहता तो कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, या मार्गावरील हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अलिबाग-रोहा परिसराला मुंबई-गोवा महामार्गाशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दररोज हजारो कामगार या मार्गाने धाटाव एमआयडीसीसह विविध ठिकाणी ये-जा करतात. त्याचबरोबर मोठ्या संख्येने चारचाकी, दुचाकी, मालवाहू वाहने आणि इतर वाहनांची वर्दळ सुरू असते.
विशेष म्हणजे, पुलालगतच रोठ खुर्द गाव असून, शाळाही जवळच आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ग्रामस्थ आणि पादचारी यांचीही या परिसरात मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत पुलाच्या कठड्याला पडलेली मोठी भगदाडे दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते.
या पुलाच्या कठड्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती व मजबुतीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या कामगारांकडून जोर धरू लागली आहे. हजारो कामगार, शाळकरी मुले आणि लाखो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावरील धोकादायक पुलाचा कठडा कधी दुरुस्त होणार? याकडे आता रोठ खुर्दसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







