प्रवाशांची गैरसोय; प्रवासी, वाहनचालकंमध्ये संताप
| चिरनेर | प्रतिनिधी |
पनवेल, मुंबई, नवी मुंबई व ठाण्यासह इतर मार्गाकडे जाणारा आणि उरण पूर्व विभागाला जोडणार्या गव्हाण फाटा-चिरनेर मार्गावरील रेल्वे पूल मार्ग मागील सहा महिन्यांपासून नव्याने बांधण्यासाठी मार्ग बंद करण्यात आल्याने उरणच्या पूर्व विभागातील दैनंदिन प्रवासी वाहतुकीसह सर्वच वाहनांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गव्हाण फाटा महामार्ग सर्कलवर वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात आणण्यासाठी एनएचआयने उरण, जेएनपीए, पनवेल व नवी मुंबईकडे जाण्याचे मार्ग सुरळीत करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून सुयोग्य असे मार्गिक उड्डाण पूल उभारले आहेत. त्यामुळे हे महामार्ग मागील एक-दीड वर्षांपासून अत्यंत सुरळीतपणे सुरु झाले आहेत. मात्र, नवी मुंबई व पनवेलसह अन्य मार्गांवरून उरण तालुक्यातील पूर्व विभागात मार्गक्रमण करण्यासाठी गव्हाण फाटा-चिरनेर मार्गांवरील रेल्वे पुलाच्या अडथळ्यामुळे उरण तालुक्यातील जांभुळपाडा, वेश्वी, दिघोडे या गावाची एसटी बससेवा बंद झाली आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील जासई, चिरनेर व आवरे जिल्हा परिषद मतदारसंघासह पनवेल तालुक्यातील केळवणे विभागातील प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांना गव्हाण फाटा सर्कलवरून सुमारे दीड किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
तर चिरनेर मार्गांवरून येणार्या वाहनांना पनवेलकडून येणार्या महामार्गाच्या उलट्या धोकादायक मार्गातून वळसा घेऊन गव्हाणफाटा मार्ग गाठावा लागत आहे. त्यामुळे या मार्गांवर अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने प्रवासी रिक्षा, मॅजिक रिक्षा आणि अन्य वाहनांना धोका निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे शहराच्या बाजापेठेसाठी व अन्य विविध कामांसाठी पनवेल, नवी मुंबई मार्गाकडे जाण्यासाठी गैरसोय होत असल्याने प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने या रेल्वेपुलाचे काम हाती घेतले आहे. परंतु, पूर्वेकडील एका बाजूच्या फाऊंडेशनचे काम झाल्याचे दिसत असून, मागील तीन महिन्यांपासून हे काम धूळखात अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसत आहे. पावसाळ्याआधी या रेल्वे पुलाचे पूर्ण करून गव्हाण फाटा-चिरनेर रस्त्याचा मार्ग सुरळीत सुरु करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी या मार्गांवरील दैनंदिन प्रवासी आणि वाहनचालकांनी केली आहे.
गव्हाण फाटा-चिरनेर महामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभाग उरणच्या अखत्यारित आहे. या मार्गावरील प्रवासी आणि वाहनचालकांची सध्या गैरसोय होत आहे. मात्र, गव्हाण फाटा-चिरनेर मार्गाला जोडणार्या पुलाचे काम मध्य रेल्वेकडे आहे. त्यांनी या रेल्वे पुलाचे काम पावसाआधी पूर्ण केल्यास या मार्गावरील प्रवाशांचा मार्ग मोकळा होईल.
नरेश पवार,
उपविभागीय अधिकारी,
सार्वजनिक बांधकाम
उपविभाग-उरण