| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रेल्वे हद्दीत एका झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल फोनची चोरी झाली होती. याबाबतच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या चोराला पकडले असून न्यायालयाने त्या चोरट्याला पोलीस कोठडीत पाठवले आहे.
दहिसर पूर्व येथील गणेश कवठे हे काही कामासाठी कर्जत येथे आले होते. ते शनिवारी (दि.10) दुपारच्या सुमारास कर्जत स्थानकातील बाकड्यावर बसले असताना त्यांना झोप लागली. त्यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या जवळील मोबाईल फोनची चोरी केली. झोपेतून जागे झाल्यावर कवठे यांना आपल्या शर्टाच्या खिशातील मोबाईल हरवल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कर्जत रेल्वे पोलीस चौकीत जाऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज संकलित करून त्यातील संशयित आरोपी इंदिरानगर-दहिवली येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याठिकाणी जाऊन नयनेश उर्फ पिंट्या अरुण शिंदे (40) याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी गुन्हे तपास पथक कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या अंगझडतीमध्ये चोरीला गेलेला मोबाईल सापडला. तसेच, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
मोबाईल चोरट्याला अटक
