रेल्वेमार्गावरील बोगद्याची कामे पूर्ण

मध्य रेल्वेकडून माहिती

। नेरळ । प्रतिनिधी ।

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून मोठ्या वेगाने कामे सुरू आहेत. 2025 मध्ये या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. या मार्गावरील कर्जत हद्दीत असलेले तिन्ही बोगदे यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. दरम्यान, मुंबईचे उपनगर म्हणून कर्जत, पनवेलच्या विकासात हा कॉरिडॉर महत्वाचा ठरणार आहे.

पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरची कामे 2025 पूर्ण करून या मार्गावरून उपनगरीय लोकल वाहतूक सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. या मार्गावर तीन ठिकाणी बोगदे असून त्यातील किरवली बोगदा सर्वात जास्त लांबीचा आहे. त्या तिन्ही बोगद्याची कामे एमआरव्हीसीद्वारे करण्यात येत आहेत. या तीन बोगद्यांचे भूमिगत खोदकाम पूर्ण झाले असून 2025 मध्ये या मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यासाठी हे कामे महत्वाची ठरत आहेत. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प एमयूटीपी-3 अंतर्गत पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्प आकार घेत आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकल्पातील सर्वात लांब बोगद्याच्या पी एक आणि पी दोन या दोन्ही पोर्टल्सच्या उद्घाटनासह कामाला सुरुवात करण्यात आली होती. सद्यस्थितीत पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉरमधील मुख्य बोगदा-2 (वावरेली बोगदा) चे 2 किमी भूमिगत खोदकाम पूर्ण झाले असून, सध्या वॉटर प्रूफिंग आणि काँक्रीट अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. बीएलटीशी (बॅलास्ट लेस ट्रॅक) संबंधित तयारीची कामे प्रगतीपथावर असल्याचे एमआरव्हीसीद्वारे सांगण्यात आले.

एकूण 3144 मीटर लांबीचे तीन बोगदे या प्रकल्पात समाविष्ट आहेत. यामध्ये 219 मीटर लांबीचा मुख्य बोगदा-1 (नढळ बोगदा), 2625 मीटर लांबीचा मुख्य बोगदा-2 (वावरेली बोगदा) आणि 3 मीटर लांबीचा बोगदा 3 (किरवली बोगदा) या प्रकल्पाचा भाग आहे. यामध्ये नढळ बोगद्याचे काम 21 ऑक्टोबर रोजी सुरू झाले आणि 10 मे 2023 रोजी ब्रेक थ्रू प्राप्त झाला. 22 फेब्रुवारी 2023 रोजी 2625 मीटर लांबीचा मुख्य बोगदा-2 वावरेली बोगदा याचे भूमिगत उत्खनन सुरू होऊन नुकतेच पूर्ण झाले आहे. तर बोगदा-3 म्हणजेच किरवली बोगद्याच्या भूमिगत उत्खननाचे कामही 29 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झाले. काही अंशी हे काम राहिले असून, एकूण तिन्ही बोगद्यांच्या भूमिगत उत्खननात एकूण 72 टक्के प्रगती आहे. दरम्यान, खोदकाम पूर्ण करण्यासोबत या बोगद्यांमधील ट्रॅक रचना बॅलास्ट लेस ट्रॅकवर असेल. समकालीन आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने सार्वजनिक आश्रय क्षेत्र, बोगदा नियंत्रण प्रणाली, प्रकाश व्यवस्था आणि वायू व्हिजन प्रणाली यासारखी पुरेशी स्मार्ट वैशिष्ट्ये तयार केली जात असल्याचे एमआरव्हीसीकडून जाहीर केले आहे.

Exit mobile version