नुकसानभरपाई देण्याची मागणी
| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील एका घरावर वीज पडल्याची घटना घडली. त्यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनेी सरकारकडे केली आहे. कोकण, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, नगर, नाशिक यासह अन्य ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला आहे. कोकणातील आंबा पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कलमांवर किडीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
पश्चिम विदर्भात रविवारी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने खरीपातील पिके तसेच भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासा देणारा मानल्ा जात आहे. बाळापूर तालुक्यात गारपीटीसह पडलेल्या पावसाने 20 मेंढ्या दगावल्या आहेत. पुढील दोन दिवस असेच वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.