। ब्रिस्बेन । वृत्तसंस्था ।
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात द गॅबा स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात पावसामुळे बराच व्यत्यय आला आहे. पहिल्या दिवसातही पावसामुळे केवळ 13.2 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी मात्र पूर्ण दिवस खेळ झाला. परंतु, तिसर्या दिवशी पुन्हा पावसाने खोडा घातला आहे. सुरुवातीपासून सातत्याने पाऊस ये-जा करत असल्याने बराचवेळा व्यत्यय आला. अखेर सामनाधिकर्यांनी तिसर्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. तिसर्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने 4 बाद 51 धावा केल्या आहेत.
तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 102 षटके आणि 7 बाद 405 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी ऍलेक्स कॅरे आणि मिचेल स्टार्क खेळत होते. मिचेल स्टार्क (18) याला जसप्रीत बुमराहने माघारी धाडले. यानंतर कॅरेला नॅथन लायनने चांगली साथ दिली होती. त्याला मोहम्मद सिराजने त्रिफळाचीत केले. पुढच्याच षटकात अर्धशतक झळकावलेला कॅरे (70) बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 117.1 षटकात 445 धावांवर संपवला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 बळी घेतले. तसेच मोहम्मद सिराजने 2 बळी, तर आकाश दीप आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर तिसर्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला उतरला. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल हे सलामीला फलंदाजीला उतरले. परंतु, जैस्वालला मिचेल स्टार्कने 4 धावांवर बाद केले. त्यानंतर तिसर्या षटकात शुभमन गिल (1) यालाही मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर विराट कोहली (3) देखील स्वस्त्यात परतला. त्याच्या पाठोपाठ ऋषभ पंत (9) देखी बाद झाला. यानंतर केएल राहुल (51) याला रोहित शर्मा साथ देण्यासाठी आला. परंतु, 17 षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबला. त्यावेळी भारतीय संघाला 51 धावाच करता आल्याने ऑस्ट्रेलियाकडे 394 धावांची आघाडी अद्याप आहे.







