शेतकरी चिंताग्रस्त, अवकाळी पावसामुळे भातपीक संकटात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यात भात कापणीचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी भातकापणीसह उडवी रचण्याचे कामात मग्न झाले आहेत. मात्र, मंगळवारी (दि.21) सायंकाळी अवकाळी पावसाने जिल्ह्यात सुरुवात केली. या पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांची धावपळ उडाली. दिवाळी सणावरही पावसाचे विरजण पडले. फटाके, कंदिलांनी सजलेली दुकाने पावसात भिजल्याने विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भातपीक बहरून कापणी योग्य झाल्याने ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भात कापणीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र 15 ऑक्टोबरला जिल्हयात सायंकाळी पाऊस पडल्याने कापणी केलेली पीक पाण्याखाली आली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. गेली पाच दिवासंपासून जिल्हयात प्रखर उष्णता जाणवत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कापणीची कामे सुरु केली आहेत. काही ठिकाणी भात कापणी करून उडवी रचण्याच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे.
उन्हाच्या तिव्रतेने लोंब्यातून दाणा अलग होत असून कापणी केली नाही, तर हाताला दाणा मिळणार नाही. याच विचारांतून भात कापणी सुरु केली आहे.दिवाळी सणाच्या अगोदरपासून बहुतांशी ठिकाणी भात कापणी सुरुवात झाली आहे. दिवसा प्रखर उष्णता आणि सायंकाळी पावसाचे आगमन यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. पावसाने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
मंगळवारी(दि.21) सायंकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली अलिबागसह अनेक भागात पाऊस जोरात सुरु झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. कापणी करून उडवी रचलेल्या भातपीकांवर प्लास्टीकचे आवरण लावण्यासाठी धावाधाव सुरु झाली. तर कापणी केलेले भात पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
कंदील, फटाके विक्रेत्यांची तारांबळ
जिल्ह्यात सध्या दिवाळीचा हंगाम सुरु आहे. ठिकठिकाणी फटाके, आकाश कंदीलची दुकाने सजली आहेत. बाजारपेठा गजबजलेल्या असताना मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण सुरू झाले. बोलता बोलता जोरदार पाऊस आला. अचानक पडलेल्या पावसामुळे कंदील, फटाके विक्रेत्यांची तारांबळ उडाली. आकाश कंदील, फटाके तसेच फुलेदेखील पाण्यात भिजली.अनेक वस्तू आडोशाला ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली. त्यामुळे विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले. पावसापासून या वस्तूंचा बचाव करण्यासाठी अनेकांनी प्लास्टीक कापडाचा आधार घेतला. यामध्ये किरकोळ विक्रेत्यांना मोठा फटका बसला.
जिल्ह्यामध्ये मंगळवारी सायंकाळी अनेक भागात पाऊस पडला आहे. येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात येत आहे.
–सागर पाठक
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके, आकाश कंदीलची दुकाने उभी केली आहेत. दोन दिवसांपासून खरेदीला सुरुवात झाली. मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे दुकानातील फटाके, आकाश कंदील भिजले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
-प्रकाश भांजी
फटाके व आकाश कंदील विक्रेते







