कार्ले गावाला पावसाचा तडाखा ; रस्ता, पाईप लाईन गेले वाहून

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याला धुंवाधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने तळ्याची संरक्षक कठडा पाण्याने ढासळला. तसेच आदीवासीवाडीकडे जाणार रस्तादेखील पाण्यातून वाहून गेला.

भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात असताना पावसाचा जोर वाढला. हा जोर कायम राहिल्याने नदी, तलाव, विहीरी तसेच धरणे पाण्याने भरून गेली. शेतांमध्ये पाणी साचल्याने या पावसाचा भात लावणीच्या कामांवर परिणाम झाला आहे. भातांच्या रोपांची लागवड करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शनिवारी रात्रभर सुरु असलेल्या पावसाने संपुर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. ढगांच्या गडगडांसह जोरदार पाऊस सुरु राहिल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले. अलिबाग तालुक्यातील कार्ले गावांतील तळ्याची संरक्षक कठडा पाण्याने ढासळला. तसेच आदीवासीवाडीकडे जाणार रस्तादेखील पाण्यातून वाहून गेला. मुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील इलेक्ट्रीक वस्तू, अन्नधान्य भिजून गेले. काहींच्या कोंबड्या पाण्याने वाहून गेल्या. पाणी घरात घुसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी देखील सकाळपासून पावसाने जोर कायम ठेवला. पावसाची रिपरिप सुरु राहिल्याने अनेक भागांमध्ये पाणी शिरले.

वाहनांचा वेग मंदावला
अलिबाग पेण, अलिबाग रोहा मार्गावर पडलेल्या खड्डयांबरोबरच पावसामुळे वाहतूकीवर त्याचा परिणाम होऊन वाहनांचा वेग मंदावला आहे. जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी या प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी इशारा पातळी पेक्षा सध्या कमी आहे. परंतू पाऊस असाच सुरु राहिल्यास, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण होऊन आजूबाजूच्या गावांना, वाड्यांना धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक असून सोमवारपर्यंत पावसाचा असाच जोर राहणार आहे, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली
रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणीसाचले आहे. खोपोलीतील शिळफाटा परीसर, डीसीनगर तसेच रसायनी जवळील पाताळगंगा एमआयडीसी भागात रस्त्यांवर पाणी साचले असून लोकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. दक्षिण रायगडमध्ये देखील अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मात्र पाऊस अधून मधून विश्रांती घेत असल्याने कुठेही पूरसदृष्य परीस्थिती निर्माण झालेली नाही. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी त्यांनी इशारा पातळी ओलांडलेली नाही. दरम्यान जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Exit mobile version