घरांच्या पडझडीमुळे अनेक बेघर
| अलिबाग | प्रमोद जाधव |
गेल्या दहा दिवसामध्ये पावसाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला आहे. कधी अतिमुसळधार तर कधी रिमझीम या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. सतत सुुरू असलेल्या पावसामुळे अलिबागसह पाच तालुक्यातील 341 घरांची पडझड झाल्याने बेघर झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. रेड अलर्टसह ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. पावसामुळे 28 धरणांपैकी 22 धरणेे पाण्याने भरून गेले आहेत.
जिल्ह्यात सावित्री, अंबा, कुंडलिका या तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीच्या वाटेवर आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील घरांची पडझड झाली आहे. काहींच्या घरांच्या भितीं, काहीच्या घरांची पत्रे तुटली आहेत. तर काहींची पुर्णतः घरे कोसळून गेली आहे. पडझड झालेल्या घरांतील नागरिक बेघर झाले आहेत. पडझड झालेल्या घरांना पुन्हा उभे करताना या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पावसामुळे संसार पाण्यात वाहून गेल्याने काय करावे अशी परिस्थित नुकसानग्रस्तांची झाली आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसात पावसाने धुमाकुळ घातला आहे. भारतीय हवामान खात्याच्या सुचनेनुसार येत्या 26 जूलैपर्यंत रेड अलर्टचा इशारा व त्यानंतर असून 29जूलैपर्यंत ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नदी, समुद्र, खाडीक किनारी राहणाऱ्या नागरिकांसह दरडग्रस्त भागातील नागरिकांनी सुरक्षीत ठिकाणी जावे. झाडाच्या खाली आडोशाला थांबू नये. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये विनाकारण बाहेर पडू नये अशा अनेक प्रकारच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर देण्यात आल्या आहेत.
घरांची पडझड झाल्यावर दृष्टीक्षेप
अलिबाग – 27
पनवेल – 04
म्हसळा – 24
तळा – 16
रोहा – 08
महाड – 10
उरण – 05
सुधागड – 36
पोलादपूर – 20
पेण – 46
माणगाव – 08
कर्जत – 23
खालापूर – 76
मुरुड – 11
श्रीवर्धन – 27
मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याच्या सुचना तलाठयांसह ग्रामसेवकांना दिल्या आहेत. नागरिकांनी पावसाचा हंगाम जोरात आहे. त्यामुळे काळजी घेऊन सुरक्षीत ठिकाणी राहवे. तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. 24 तास ही यंत्रणा कार्यान्वीत आहे.
विक्रम पाटील – तहसीलदार , अलिबाग