पाली तालुक्याला पावसाने झोडपले

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पालीसह सुधागड तालुक्यात बुधवारी दि.(07) सायंकाळी वादळी वार्‍यासह , विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जणू काही ढगफुटी होऊन आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. सर्वत्र ढग दाटून आल्याने व विजबत्ती गुल झाल्याने अंधाराचे सावट पसरले.

सुधागड तालुक्यात भालगुल,कानिवली, माणगाव बुद्रुक या गावांना दरडीचा धोका असल्याने येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. नागरिकांनी आपले घर , सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीने घरात पाणी शिरणार नसल्यास घरात सुरक्षित राहावे, तसेच आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी अगोदरच सुरक्षित स्थळी न्यावेत, असे आवाहन तालुका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.या बरोबरच सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना व खबरदारी घेण्याचे आदेश पाली तहसीलदार रायन्नावार यांनी दिले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन किंवा स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ मदत मागावी, तसेच मुसळधार पावसात नागरिकांनी बाहेर पडू नये, स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, प्रशासन आपल्या सोबत असल्याचे पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले.

Exit mobile version