नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
। सुधागड । धम्मशील सावंत ।
सुधागड तालुक्यात भेरव गावाजवळ काही नागरिकांना तरसाचे दर्शन झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (ता.8) रात्री येथील तरुणाने भेरव गावाजवळील रस्त्यावर फिरणाऱ्या तरसाला पाहिले व त्याचा व्हिडीओ बनविला आहे.
हा व्हिडीओ अनेक व्हॉट्सअप ग्रुप व समाज माध्यमांवर फिरत आहे. या संदर्भात पाली-सुधागड वनक्षेत्रपाल रितेश नागोशे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की वन्यजीव सहसा माणसावर हल्ला करत नाहीत. ते माणसापासून सुरक्षित अंतर पाळत असतात. माणूस त्यांच्या जवळ आला तर ते स्वरक्षणासाठी हल्ला करतात. तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. त्याचबरोबर तरस जखमी असेल किंवा मादीसोबत पिल्लं असतील तरच ते माणसावर हल्ला करु शकते. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील वनक्षेत्रपाल रितेश नागोशे यांनी केले.