हॉकीमध्ये उझबेकिस्तानचा 16-0 ने पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा पहिल्या दिवशी भारताने धमाकेदार सुरुवात केली. आतापर्यंत भारताला 5 पदके मिळाली आहेत. दरम्यान, हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव करून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. भारताकडून ललित उपाध्यायने सर्वाधिक चार गोल केले. तर वरुण कुमार आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी 3 गोल केले. आता पुढील सामन्यात भारताचा सामना सिंगापूरशी मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी होणार आहे.
सामन्यात सुरुवातीपासूनच भारताने चेंडूवर आपले नियंत्रण राखले. ललित कुमार उपाध्यायने सामन्याच्या सातव्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. दरम्यान भारताने आणखी एक गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली. जेव्हा भारतीय खेळाडू वरुणने आपल्या ड्रॅग फ्लिकचे गोलमध्ये रूपांतर केले. अशाप्रकारे, पहिल्या क्वार्टरपर्यंत ललित आणि वरुणच्या गोलमुळे भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आक्रमण आणि बचावामुळे उझबेकिस्तानवर दबाव कायम ठेवला.
दुसऱ्या क्वार्टरला सुरुवात होऊन दोनच मिनिटे झाले असताना अभिषेकने गोल केला आणि 3-0 अशी आघाडी घेतली. पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगने उत्कृष्ट पास गोलपोस्टमध्ये पाठवून संघाची गोलची संख्या वाढवली. सामन्याच्या 24व्या मिनिटाला ललित कुमार उपाध्यायने आणखी एक गोल करत संघाची धावसंख्या 5-0 अशी नेली. अशा प्रकारे भारत विरुद्ध उझबेकिस्तान सामना एकतर्फी झाला होता. मनदीप सिंगने 27व्या आणि 28व्या मिनिटाला दोन बॅक टू बॅक गोल करत केले. भारताने पहिल्या हाफपर्यंत 7-0 अशी आघाडी कायम ठेवली आणि उझबेकिस्तानला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवत उझबेकिस्तानच्या खेळाडूंना संधी दिली नाही. अशा प्रकारे आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.