निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्‍वासनांचा पाऊस

रुबिना बिरवाडकर यांची स्थानिक आमदारांवर टीका

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मागील निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यास अपयशी ठरलेले शिंदे गटाचे आमदार आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सध्या आश्‍वासनांचा पाऊस पाडत असल्याचे चित्र मतदारसंघामध्ये दिसून येत आहे, अशी टीका मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायतीच्या सदस्य रुबिना बिरवाडकर यांनी केली आहे.

अलिबाग-रोहा रस्त्याचे काम स्वतःच्या खर्चाने करेन, असे आश्‍वासन विद्यमान आमदार दळवी यांनी दिले होते. या आश्‍वासनावरच मते मिळवून ते आमदार झाले. या साडेचार वर्षांमध्ये रस्त्यासाठी अनेक वेळा भूमीपूजन केले; परंतु, आजतागायत हा रस्ता त्यांनी पूर्ण केलाच नाही. या पावसात प्रवाशांसह नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करण्याची वेळ आमदारांमुळे आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अनेक रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन करून घेतले. मात्र, आजही अनेक गावे खड्ड्यातच असल्याची स्थिती आहे. मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी आणल्याच्या बाता मारल्या. परंतु, हा निधी नक्की गेला कुठे, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनता विचारात आहे.

सध्या भाजप विरुद्ध शिंदे गट शिवसेना यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यात वाद सुरू आहे. एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेतले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व टिकून राहावे यासाठी विद्यमान आमदारांनी पुन्हा आश्‍वासनांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील अल्पसंख्याक समाजाच्या महिलांची बैठक घेण्यात आली. अल्पसंख्याक समाजाच्या महिलांच्या शंकाचे निरसन करणे व सुसंवाद साधणे याकरिता खुल्या चर्चेचे आयोजन दळवी यांनी केले होते. या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, अशी खोटी आश्‍वासने दिली.

पाच वर्षे आमदार होते कुठे?
मुस्लिम समाजातील महिलांची त्यांना आता पाच वर्षांनी आठवण झाली आहे का? त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री, स्वतः आमदार पण आमच्या मुरुडच्या अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी कोणतीही योजना आणलेली नाही आणि विकास केलेला नाही. फक्त कागदावर विकास केल्याचे दाखवले आहे. खोटी प्रलोभने देऊन मत मागण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. अगोदर दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करा, त्यानंतर पुढील आश्‍वासने द्या, अशी टीका रुबिना बिरवाडकर यांनी केली आहे.

आमदार खोटी आश्‍वासने देऊन फक्त गावोगावी फलक लावत चालले आहेत. एवढी वर्षे अल्पसंख्याक समाजाला जवळ न घेणारे, आमदारकी डोळ्यासमोर ठेवून मतांचा जोगवा मागण्यासाठी खोटी आश्‍वासने देत आहेत. कोरोना, चक्रीवादळ काळात आमदार होते कुठे?

चित्रलेखा पाटील,
शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख

Exit mobile version