रायगडसह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
| मुंबई | प्रतिनिधी |
पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांत पावसाचे ढग दाटून येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात रायगडसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी आणि मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. विशेषतः मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवसांत होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो. मात्र, काही भागांत पावसाचा जोर वाढल्यास उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यताही आहे.
रायगडसह कोकणातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशातील उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या भागांतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत जोरदार वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कुठे पावसाचा अंदाज?
महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर तसेच विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
