। उरण । वार्ताहर ।
सिडकोच्या ढिसाळ कारभाराचा फटका नवघर येथील जनतेला सहन करावा लागत आहे. सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे व सिडकोच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नवघर गावाला बसला असून ग्रामस्थांच्या घरांना पाणी घुसले आहे.
गेल्या तीन चार दिवसापासून सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे तसेच समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे नवघर गावासह परिसरात पाणीच पाणी झाले होते. ग्रामस्थांच्या घरांना पाणी घुसले आहे. याला सर्वस्वी सिडको प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सिडको अधिकारी वर्गाला येथील परिस्थीती निदर्शनास आणूनही काहीच ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीत फक्त कागदावरचे घोडे दिमटवून येथील जनतेची व प्रशासनाची सिडको अधिकारी दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.
दरवर्षी वर्षी नालेसफाई तसेच समुद्र व पावसाचे पाणी गावात साचणार नाही याबाबत केलेली उपाययोजना ही फक्त कागदावरच असते प्रत्यक्षात नालेसफाईच्या नावाने कामे काढून ठेकेदार व सिडको अधिकारी मालामाल झाले आहेत. आमच्या घरांना दरवर्षी पावसाळ्यात पाणी घुसत असतानाही सिडको प्रशासन व त्यांचे अधिकारी वर्ग यांना याचे काहीच सोयरसुतक पडलेले दिसत नाही. तरी दरवर्षी सिडकोच्या माध्यमातून नाले सफाईच्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी करून आम्हां ग्रामस्थांची यातून कायमची सुटका करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.