आरोग्य सुविधा लाभ घेण्याचे आवाहन
| मुरूड | वार्ताहर |
राज्य शासनाच्या आरोग्य विभागा तर्फे राज्यात सर्वत्र विशेष इंद्रधनुष मिशन मोहीम ऑगस्ट महिन्यापासून तीन टप्य्यात राबविली जात आहे. त्यानुसार मुरूड नगरपरिषद हद्दीत मुरूड ग्रामीण रूग्णालयाकडून विशेष इंद्रधनुष मिशन मोहीम-23 राबविली जात असून विनामूल्य शासकीय आरोग्य सुविधा आणि लसीकरणाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मुरूड फातिमा बेगम व लेडी कुलसुम बेगम संयुक्त ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले यांनी केले आहे.
मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन लसीकरण केले जात आहे. मोहिमेला मुरुडकरांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. मोहिमेची दुसरी फेरी दि.11 ते 16 सप्टेंबर, तिसरी फेरी दि.9 ते 14 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. 0 ते 5 वर्षें वयोगटातील लाभार्थी बालके, गरोदर माता यांचे घरोघरी सर्वेक्षण करून अद्ययावत यादी तयार केली जात असून, मोहीमेत नियमित लसीकरणाच्या लसी सोबतच गोवर, रुबेला, पिसिव्ही, पोलिओ, आय.पी.व्ही, हिपॅटिस, पेंटा-2, जीवनसत्व अ, डीपीटी बुस्टर असे आवश्यक महत्वाचे लसीकरण विनामूल्य केले जात आहे. मुरूडमध्ये 37 बालके लसीकरणापासून वंचित असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मुरूड ग्रामीण रुग्णालयात इंद्रधनुष मिशन सुरू झाल्या नंतर आता पर्यंत 540 बालक आणि मातांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
या विशेष मोहिमे बाबत बोलताना सांगितले की, राज्य आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर-23 पर्यंत तीन फेऱ्यामध्ये मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे.
डॉ. उषा चोले, मुरूड फातिमा बेगम ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक