। पनवेल । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पनवेलकरांना आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने थोडासा दिलासा दिला. दमट हवामानामुळे पावसाची चिन्हे दिसत असतानाच, सकाळी 8 वाजताच्या सुमारास पनवेलसह परिसरात पावसाने हजेरी लावली. अवकाळी आलेल्या पावसासोबतच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यामुळे घराबाहेर नोकरीसाठी किंवा विविध कामांसाठी गेलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांत अचानक आलेल्या पावसामुळे गोंधळ उडाला. दोन चाकी वाहनधारकांची त्रेधा उडाली; काही जणांनी झाडाखाली, तर काहींनी बस स्टॉपचा आसरा घेतला. अचानक आलेल्या या पावसाने रस्त्यांवर वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली, परंतु अनेकांनी याचा मनमुराद आनंदही घेतला.
पावसाच्या सरींसोबत आलेल्या गार वार्याने वातावरण थोडं शांत झालं. पण कार्यालयाला जाणारे कर्मचारी, काही शाळांचे विद्यार्थी आणि दुचाकीवरून प्रवास करत असलेल्यांना पावसाने भिजवून टाकले. असे असले तरी काही लहान मुलांनी मात्र पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात पाणी साचले.
हवामान विभागाने आधीच काही भागांत उकाड्याचा आणि काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. ही स्थिती येत्या काही दिवसांत पुन्हा निर्माण होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे. वातावरणातील बदल आणि ढगाळ हवामान पाहता पुढील दोन-तीन दिवस थोड्या फार सरींचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नव्हे, तर उकाड्याने हैराण झालेल्या पनवेलकरांसाठी दिलासा ठरला.







