दुर्दैवी! अंगावर वीज पडून तरुणीचा मृत्यू

मुरबाडमध्ये गारांचा पाऊस

। ठाणे । प्रतिनिधी ।

मुरबाड तालुक्यातील धसई परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसात अंगावर वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला, तर तिचे वडील जखमी झाले. रविना सांडे असे मृत तरुणीचे नाव असून तिने नुकतीच बारावी परीक्षा दिली होती. तसेच, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचीदेखील मोठी तारांबळ उडाली.

ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यात रविवारी संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस पडला. विजांसह काही ठिकाणी गाराही कोसळल्या. याचवेळी धसईलगतच्या अल्याणी गावातील रविना सांडे (18) ही दुचाकीवरून वडील राजाराम सांडे यांच्याबरोबर धसईकडून घराकडे जात होती. अचानक पाऊस सुरू झाल्यानंतर वडील आणि मुलगी एका घराबाहेर थांबले होते. ते दोघेही पाऊस उघडण्याची वाट पाहत असताना अचानक रविनाच्या अंगावर वीज पडली. या दुर्घटनेत रविना गंभीर जखमी झाली. तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

तसेच, मुरबाड तालुक्यात या अवकाळी पावसाने वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले. भाजण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विटा भिजल्या. पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. गुरांसाठी साठवण्यात आलेला चाराही अनेक ठिकाणी भिजला. वादळीवाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही पडली.

Exit mobile version