शेतकरी, वीटभट्टी व्यावसायिक धास्तावले
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात रविवारी पहाटे अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे फळ उत्पादक शेतकरी, वीटभट्टी व्यवसायिक व शेतकर्यांचे धावपळ उडाली. साखर झोपेत असलेल्या अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.
मार्च महिन्यानंतर, एप्रिल आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. गेल्या आठ दिवसापुर्वी हवामान खात्याने अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. रविवारी ( 7 मे ) रोजी पहाटे तीन ते चारच्या सुमारास अवकाळी पाऊस अलिबागमधील ग्रामीण व शहरी भागात पडला. अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यात कित्येक तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेकांना रात्र अंधारात घालवावी लागली.
अवकाळी पाऊस पडल्यावर शेतकर्यांसह विट भट्टी व्यवसायिकांची धावपळ उडाली. भात झोडणीनंतर रचून ठेवलेला पेंढा पावसात भिजल्याने त्यावर प्लास्टीक कापड टाकण्यात आला. तसेच विटभट्टी व्यवसायिकांनीदेखील तयार केलेल्या विटा खराब होऊ नये म्हणून त्यावर प्लास्टीक कापड व अन्य बचावासाचे साहित्य ठेवले होते. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांसह वीट व्यवसायिक चिंताग्रस्त झाला असून आंबा उत्पादक शेतकरी देखील भयभीत झाले आहेत. आंबा तयार होऊन लवकरच बाजारात येण्याच्या तयारीत असताना तयार झालेले आंबे डागळण्याची भिती अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भिती शेतकरी पांडुरंग भोपी यांनी व्यक्त केली.
मोका वादळाचा परिणाम
राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकर्यांचे हातचे पिक वाया गेले आहे. अवकाळी पावसामुळे काही जिल्ह्यांत पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना सरकारकडून मदत मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. दरम्यान, आज सकाळपासून मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक भागात हवामानात बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात मोका वादळ निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.