श्रीवर्धनमध्ये मुसळधार पाऊस; भट्टीचा माळ येथे भिंत कोसळली

I श्रीवर्धन I आनंद जोशी I

हवामान खात्याच्या इशा-याप्रमाणे गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. श्रीवर्धन तालुकाही याला अपवाद नाही. तहसील कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आज ता. १२  जुलै रोजी सकाळपर्यंत तालुक्यात 214 मि. मी.पाऊस  पडला असून यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस 1841 मि. मी. इतका झाला आहे.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठेत ग्राहकांची संख्या अगदी तुरळक होती. कोठे दरडी वगैरे कोसळल्याच्या घटना नाहीत. मात्र श्रीवर्धन – बोर्ली रस्त्यावर कार्ले येथे पाणी आल्याने बॅरिकेड्स लावून रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर तालुक्यात भट्टीचा माळ येथे पावसामुळे एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. मात्र जीवितहानी झाली नाही.

पावसाच्या संततधारेमुळे बागायती भागांत वाड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे केळीसारखी काही झाडे कोसळलेली दिसतात. मात्र श्रीवर्धनला अरबी समुद्र असल्याने पडलेले पावसाचे सारे पाणी काही तासांतच समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे सखल गावांप्रमाणे येथे कधीही पूर वगैरे येत नाही.

Exit mobile version