कबड्डी स्पर्धेत नवयुवक सोनार सिद्ध धाटावची बाजी

नागावमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात
आ. जयंत पाटील यांची उपस्थिती

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील नागाव येथे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रणसंग्राम क्रीडा मंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.5) शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतील अंतिम सामना रोह्यातीलच दोन संघांमध्ये झाला. नवयुवक सोनार सिद्ध धाटाव विरुद्ध काळभैरव उडदवणे यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात नवयुवक सोनार सिद्ध धाटाव या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत प्रथम येणार्‍या नवयुवक सोनार सिद्ध धाटाव या संघास रोख रक्कम 15 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांकास रोख रक्कम 11 हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक पटकाविणार्‍या दर्यावर्दी बंदर नागाव व चतुर्थ क्रमांक मिळविणार्‍या स्वराज्य आक्षी संघास रोख रक्कम 7 हजार रुपये व चषक देण्यात आले.

याशिवाय सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नवयुवक सोनार सिद्ध धाटाव संघातील खेळाडू अजय मोरे, उत्कृष्ट चढाई करणारा काळभैरव उडदवणे संघातील कुमार कोलटकर, उत्कृष्ट पक्कड धाटाव संघाचा रुतीक रटाटे आणि पब्लिक हिरो म्हणून स्वराज्य आक्षी संघातील राहुल मुजावर याचा गौरव करण्यात आला. यावेळी रणसंग्राम क्रीडा मंडळाचे पदाधिकारी अनिरुद्ध राणे, रोहित राणे, शुभम नाईक, मनीष भगत, राकेश माने, विप्रय सावंत, दिपन राणे, सुशांत सुतार, ओमकार भगत, वृणाल सुतार, आरडीसीसी बँकेचे मंदार वर्तक, मंगेश राणे, विकास पिंपळे, राकेश राणे, प्रसाद सुतार आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच रणसंग्राम क्रीडा मंडळातील खेळाडूंना सरावासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमोल सावंत यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहकार्य करणार्‍या प्रत्येकाचे रणसंग्राम क्रीडा मंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version