दोन जुळ्या बहिणींचा ‘राज’ बनला देवदूत;दुर्धर आजारावर केली मात

। कर्जत । संजय गायकवाड ।
थॅलेसेमिया म्हणजे बोनमॅरो या दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या चौक येथील दोन जुळ्या बहिणींसाठी त्यांचाच लहान भाऊ देवदुत बनला आहे.राज असं नाव असलेल्या या नऊ वर्षीय भावाने आपले बोनमॅरो दान करीत या बहिणींचे प्राण वाचविले आहेत.

चौक येथील एका छोट्याशा गावात बारा वर्षांपुर्वी स्वरांजली आणि स्वराली या दोन जुळ्या बहिणींचा जन्म झाला. जन्मानंतर काही दिवसातच या दोन मुलींना आजार चालू झाले. चेहरा सुजणे तसेच डोळयांना संसर्ग होऊन अनेक समस्यांनी त्यांना ग्रासले. या करता मुंबई पुण्यासह अनेक दवाखाने पालकांनी पालथे घातले, पण योग्य निदान होत नव्हते. मुली साडेचार वर्षाच्या झाल्यावर एका बालरोग तज्ज्ञांकडून दोघींना थॅलेसेमिया म्हणजे बोनमॅरो झाल्याचे निदान झाले. मुळात कुटुंबिय गरीब असल्याने आजाराची माहिती कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबाकडे उपचाराचा खर्च व बोनमॅरो मिळणे मोठे आव्हानच होते. याकरता घरातील नऊ वर्षीय राज हा त्यांचा छोटा भाऊ या चिमुकलींकरता देवदूत बनला. राजचं रक्त या दोघींकरता 100 टक्के मॅच झाले आणि चालू झाला आजारावर मात करण्याचा सिलसिला.

कुटुंबीयांकडे असलेली जमापूंजी चिमुकलींच्या आजारावर खर्च झाली आणि पुढे येणारा खर्च हा सुमारे 37 लाख एवढा प्रचंड मोठा होता.खर्च मोठा असल्याने तसेच मुलींचे वडील कंत्राटी कामगार असल्याने होणारा खर्च कुटुंबियांच्या आवाक्याबाहेर होता. याकरता मुलींच्या वडीलांनी सोशल मिडीयावर दानशूर लोकांना मदतीचे आवाहन केले तर छु-मंतर ह्या विनोदी नाटकांच्या माध्यमातून कलाकारांनी आपलं मानधन न घेता निधी उपलब्ध करून दिला तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी पैशांची मदत केली तर कर्जत पनवेल चौकसह रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी या चिमुकलींचे जीव वाचवण्यासाठी नाटकाचे प्रयोग केले गेले.

दोन चिमुकलींवर उपचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी मुलींच्या उपचारासाठी मदत मिळावी यासाठी मेसेज केला. त्याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री सहाय्यता निधि कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना फडणवीस यांनी याबाबत माहिती देऊन सुचना केली व मुलींना कशा प्रकारे मदत करण्यात येईल हे बघायला सांगितले. शेटे यांनी टाटा ट्रस्टला मदत करण्याचे पत्र दिले. टाटा ट्रस्टने देखील लगेचच दोन मुलींच्या उपचारासाठी सुमारे नऊ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. दोन चिमुकलींना भायखळा येथील हाजीअली एसआरसीसी चिल्ड्रेन रूग्णालयात दाखल करण्यात आले.

आज या मुली 80 टक्के बर्‍या झाल्या असून अजून पूर्णपणे बर्‍या होण्यासाठी तिन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तर दोघींना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. मुलींची काळजी पालक घेत आहेत.

अनोखी भाऊबीज
दोघी बहीणी जुळ्या असल्याने दिसायला एक सारख्या आहेत. त्यामुळे उपचारातील चुका टाळण्यासाठी दोघींना वेगवेगळ्या रूम मध्ये ठेवण्यात आले. या दोन चिमुकलींचा भाऊ त्यांचा डोनर असल्याने त्याला देखील त्यांच्या बरोबर रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार वेदनाशामक असल्याने या तिघा लहान भावंडांकरता ही जीवनाची परीक्षा होती. परंतू, लढाई ह्या तिन्ही चिमुकल्यांनी जिंकून यशाचे शिखर गाठले. एकदा नाही तर दोन दोन वेळा राज ह्या त्यांच्या छोट्या भावाने आपल्या दोन बहिणींना बोनमॅरो देत आपल्या बहीणींचे प्राण वाचवून अनोख्या पद्धतीने भाऊबीज दिली आहे.

तिन्ही मुलांची एच एल ए चाचणी केली असता तिघांचाही अस्थिमज्जा 100 टक्के जुळला ही अत्यंत दुर्मीळ घटना म्हणावी लागेल.

डॉ. रूचिरा मिश्रा, बालरोग तज्ज्ञ

Exit mobile version