राज ठाकरे म्हणतात…नवी मुंबई विमानतळाला ‘यांचं’ नाव असावं

। मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याचा आग्रह धरला आहे तर, राज्य सरकारच्या पातळीवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जावं यासाठी पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी राज यांच्याकडं केली. पत्रकारांशी बोलताना राज यांनी आपली भूमिका मांडली. ‘कोणतंही विमानतळ उभं राहताना शक्यतो शहराबाहेरची जागा निवडली जाते. तेव्हाच्या मुंबईच्या सीमेनुसार मुंबईतील विमानतळ सांताक्रूझला गेलं. कालांतरानं ते वाढत सहारपर्यंत गेलं. नंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी होऊन स्थानिक ठिकाणांच्या नावानं ती विमानतळं ओळखली जाऊ लागली. आता नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. माझ्या माहितीनुसार, मुंबईतील विमानतळ हे देशांतर्गत विमानसेवेसाठी असेल आणि नवी मुंबईतील नवं विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. त्यासाठीच शिवडी-न्हावा शेवा मार्ग होतोय. त्यामुळं त्याला शिवरायांचंच नाव राहील असं मला वाटतं,’ असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

‘विमानतळांचं नामकरण करण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय आहेत. दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. दोन्ही नेत्यांच्या मोठेपणाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव योग्य वाटतं,’ असं ते म्हणाले.

‘विमानतळाच्या नावाचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला गेलाय की नाही माहीत नाही. पण आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलतोय याचं भान आपल्याला असायला हवं. त्याला जे नाव आधी आहे, तेच नाव राहणार. ते तुम्ही कसं बदलणार,’ असा सवाल राज यांनी केला.

‘शिवाजी महाराजांच्या नावावर चर्चा होऊच कशी शकते? बाळासाहेब स्वत: असते तरी त्यांनी शिवाजी महाराजांचंच नाव द्या असं सांगितलं असतं,’ असंही राज म्हणाले. ‘शिवाजी महाराजांचं नाव येणार असेल तर आमचा आक्षेप नसेल असं कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी देखील स्पष्ट केलंय,’ अशी माहितीही राज यांनी दिली.

Exit mobile version