मतचोरांना अद्दल घडवणार- राजाभाऊ ठाकूर

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगावात ईव्हीएम, व्हीव्ही पॅट मशीनविरोधात अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांनी जनआंदोलन करीत एल्गार केला. यावेळी माणगाव येथील कार्यक्रमात बोलताना मतचोरांना अद्दल घडविल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा इशारा राजाभाऊ ठाकूर यांनी दिला.

दरम्यान, राजाभाऊ ठाकूर यांनी विधानसभेच्या लागलेल्या निकालाचा खरपूस समाचार घेत महायुतीचा हा विजय म्हणजे ईव्हीएम, व्हीव्ही पॅट मशीनचा हा विजय आहे. या मशीनमध्ये काहीतरी गडबड निश्‍चित असल्याचे ठाम मत व्यक्त करीत या मशीनविरोधात त्यांनी माणगाव येथून आपला जनआंदोलनाच्या मार्गाने सोमवार, (दि.9) ईव्हीएम,व्हीव्ही पॅट मशीनविरोधात एल्गार सुरु केला आहे. याअगोदर आठ ते दहा दिवस त्यांनी रायगड जिल्हाधिकारी तसेच सर्व संबंधितांशी पत्रव्यवहार करून त्यांना निवेदन देऊन ते पोच घेऊन आले. मात्र, माणगावत हे आंदोलन सुरु कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोलिसांनी त्यांना ईव्हीएम, व्हीव्ही पॅट मशीनचे प्रात्यक्षित दाखवू नका, अशी नोटीस दिली. तसेच आठ दिवस अगोदर माणगाव प्रांताधिकारी व तहसीलदार यांना या आंदोलनाबाबत निवेदन देऊनही तहसील कार्यालयामार्फत आंदोलन सुरु झाले त्याच दिवशी व्यासपीठावर त्यांचे कोतवाल नोटीस घेऊन आले. त्यावेळी राजाभाऊ ठाकूर यांनी पोलिसांचे निवेदन स्वीकारून त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन केले. मात्र, तहसील कार्यालयामार्फत ऐनवेळी आंदोलन दिवशी ‘वराती मागून घोडे’ त्याच दिवशी नोटीस आल्याने आता ही नोटीस मी स्वीकारणार नाही, पुन्हा कधी स्वीकारेन असे सांगून त्यांनी माझा हा लढा आता सुरु झाला असून, यामध्ये मला मरण आले तरी मी घाबरणार नसल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी तहसील कार्यालयाचा ढिसाळ कारभार उपस्थितांसमोर ठेवला. यावेळी आक्रमक भूमिका घेतलेल्या राजाभाऊ ठाकूर यांनी माझ्या या आंदोलनाला मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, शेकाप, बच्चू कडू यांची प्रहार संघटना, हितेंद्र ठाकूर यांच्यासह अनेकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनमुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे ठाकूर यांनी सांगत आता सर्वांनी पेटून उठा अन्यथा देशात, राज्यात हुकूमशाही आणखीन डोके वर असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनास ज्येष्ठ नेते नाना सावंत, डॉ. जमाल कुरुक्कर, सतीश लोंढे, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास सुर्वे, काँग्रेसचे जिल्हा चिटणीस डॉ. नरेंद्र सिंह, यशवंत गंगावणे, मौलाना कासीम सोलकर, साधिका राऊत, राजेंद्र गायकवाड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version