दिल्लीची बंगळुरूवर दंबंगगिरी; आरसीबीचा गड केला उद्ध्वस्त
| बंगळुरू | वृत्तसंस्था |
आयपीएलच्या 26व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6 गडी राखत पराभूत केले आहे. बेंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती; परंतु, डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकात सलग 2 षटकार मारून दिल्लीला विजय मिळवून दिला. त्यामुळे बंगळूरूला घरच्या मैदानावरच हार पत्करावी लागली. या विजयामुळे दिल्लीने गुणतालिकेत मोठी झेप घेत 6 गुणांसह टॉप-4 मध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, या पराभवामुळे बंगळुरुच्या विजयी लयीत खंड पडला.
बंगळुरूसाठी सलामीला विराट कोहली आणि फिल सॉल्ट मैदानात उतरले होते. परंतु, विराट कोहली 19 धावांवर लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल देखील 18 धावांवर परतला. दुसऱ्या टोकाला फिल सॉल्टने मात्र आक्रमक खेळी करत डाव सावरला. त्याने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 63 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली आणि संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाजांमध्ये रजत पाटीदार (8), टीम डेव्हिड (26), जितेश शर्मा (14), रोमॅरियो शेफर्ड (1), कृणाल पांड्या (12) आणि भुवनेश्वर कुमार (3) यांनी छोटेखानी योगदान दिले. त्यामुळे आरसीबीला निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावत 175 धावा फलकावर लावता आल्या. यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अक्षर पटेल, लुंगी एनगिडी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, मुकेश कुमार याने 1 बळी घेतला.
बंगळुरूने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि पथुम निस्संका यांनी केली. यादरम्यान, बंगळुरूच्या भुवनेश्वर कुमारने एकाच षटकात 2 बळी घेत सलग तीन धक्के दिले. भुवनेश्वरने निस्संकाला 1 धावेवर, करुण नायरला 5 धावांवर आणि समीर रिझवीला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर राहुलने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 34 चेंडूंमध्ये 57 धावा करत संघासाठी अर्धशतक झळकावले. राहुल व्यतिरिक्त, ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांनीही संघासाठी उत्कृष्ट खेळी केली. स्टब्सने 4 चौकार आणि 1 षटकारासह 47 चेंडूंमध्ये नाबाद 60 धावा केल्या. अक्षर पटेल 3 चौकारांसह 19 चेंडूंमध्ये 26 धावा करून दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. डेव्हिड मिलरने 1 चौकार आणि 2 षटकारांसह 10 चेंडूंमध्ये 20 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यावेळी बंगळूरूकडून भुवनेश्वर कुमारने 3 बळी आणि कृणाल पांड्याने 1 बळी घेतला.






