राजू शेट्टींचा समाजापुढे आदर्श

मुलाचा विवाह साधेपणाने साजरा

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

कुठल्याही प्रकारचा डामडौल न करता साधेपणाने जीवन जगणारे, शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारे माजी खा. राजू शेट्टी यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही साधेपणा जपल्याचे दिसत आहे. त्यांच्या मुलाचा विवाह साधेपणाने साजरा करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

याबाबत त्यांनी समाजमाध्यमे तसेच प्रसारमाध्यमांवर एक कौटुंबिक आवाहनच केलेले आहे. ते आपल्या आवाहनात म्हणतात की, माझा एकुलता एक मुलगा चि. सौरभ आणि चि.सौ.कां. समृद्धी यांचं लग्न 9 जुलैला अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. खरं तर, गेल्या 35 वर्षांमध्ये अनेक सहकारी, जिवलग व जिव्हाळ्याच्या लोकांच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. आता हे माझे सवंगडी व साथी यांना लग्नाला बोलावणे माझे नैतिक कर्तव्य आहे आणि हे सगळे सहभागी झाले असते तर मला अत्यंत आनंद झाला असता, परंतु महाराष्ट्राच्या व देशभराच्या कानाकोपऱ्यामध्ये मी अनेक जिव्हाळ्याची माणसे जोडलेली आहेत. ही माणसे मोजण्याच्या पलीकडे आहेत. हा एवढा गोतावळा आहे की, या सगळ्या गोतावळ्याला एकाच वेळी बोलवणे अशक्यप्राय गोष्ट आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या सगळ्यांचे व्यवस्थापन व नियोजन माझ्या कुवतीच्या पलीकडचे आहे. म्हणून मी असा एक निर्णय घेतलेला आहे की, अत्यंत साधेपणाने विवाह समारंभ पार पाडायचा. पण, या माझ्या जोडलेल्या व जिव्हाळ्याच्या लोकांचा शुभाशीर्वाद माझ्या मुलाला व सूनबाईला मिळायला पाहिजे, ही माझी तीव्र इच्छा आहे. त्यासाठी 10 ते 14 जुलै या पाच दिवसांमध्ये तुम्ही समक्ष माझ्या घरी येऊन वधूवरांना शुभाशीर्वाद दिला तर मलाही आनंद होईल. आणि तुमच्यासहीत वधूवरांचा आणि माझा एक फोटो माझ्या आठवणीमध्ये कायम राहील. मी प्रत्येकाला व्यक्तिगत निमंत्रण देऊ शकत नाही. पण, याच माध्यमातून तुम्हाला विनंती करतो. आजपर्यंत तुमच्या सुख-दुःखामध्ये मी सहभागी झालेलो आहे, आज माझ्या घरच्या लग्नकार्याला तुम्हाला प्रत्यक्ष येता येणार नाही. तरी घरी येऊन नववधूवरांना आशीर्वाद द्या, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे. समाजमाध्यमांनी या आवाहनची चांगल्या प्रकारे दखल घेतली आहे.

Exit mobile version