। अलिबाग। प्रतिनिधी ।
अलिबागचे एसटी बस आगाराचे व्यवस्थापक अजय वनारसे यांची मुंबई सेंट्रल विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी पालघर विभागातील जव्हार एसटी बस आगारातील व्यवस्थापक राकेश देवर यांची बदली झाली आहे. राकेश देवरे यांनी सोमवारी (दि.23) अलिबागचा पदभार हाती घेतला आहे.
अजय वनारसे अलिबाग आगारामध्ये जानेवारी 2020 मध्ये आगार व्यवस्थापक वरिष्ठ या पदावर रुजू झाले होते. गेली साडेतीन वर्षे त्यांनी अलिबागचे आगार व्यवस्थापक म्हणून कामकाज पाहिले आहे. आगारातील उत्पन्न वाढावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी अलिबाग-पनवेल फेर्यांवर भर दिला होता. साडेतीन वर्षाहून अधिक सेवा केल्यानंतर त्यांची बदली मुंबई सेंट्रल येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता राकेश देवरे आले आहेत. त्यांनी गेली 14 वर्षे एसटी महामंडळात सेवा केली आहे.गेली काही वर्षे ते जव्हार आगारात कार्यरत होते. त्यांनी चांगले काम केल्याची माहिती समोर येत आहे. अलिबाग एसटी बस स्थानकात जुन्या गाड्या असून त्या सतत बंद होणे, बसेस वेळेवर न लागणे, अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. या तक्रारींचे निरसन करण्यामध्ये यशस्वी ठरतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.