| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलिबाग तालुक्यातील आवासच्या यात्रेला लाखो भक्त दर्शनासाठी जातात. यंदाही ही यात्रा मंगळवारी (दि.4) भरणार आहे. येथील नागेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून अलिबाग एसटी बस आगारातून 10 ज्यादा बसेसचे नियोजन केले आहे. यात्रेसाठी एसटी सज्ज असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वरची यात्रेची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे. यंदा मंगळवारी आवासमधील नागेश्वरची यात्रा आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी भक्तांची गर्दी असणार आहे. काही भक्त बैलगाडा घेऊन दर्शनासाठी जाणार आहेत. ही परंपरा आजही जपण्याचे काम बैलगाडी हौशी मंडळी करीत आहेत. तसेच, दर्शनासाठी जाणाऱ्या इतर भक्तांसाठी अलिबाग एसटी बस आगारामार्फत एसटी बसची व्यवस्था केली आहे. यावेळी एकूण दहा ज्यादा बसेस मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सोडल्या जाणार आहेत. यात्रा संपेपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे. पेण व कर्जत आगारातूनही ज्यादा बसेस मागविण्यात आल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली.
आवास येथील नागेश्वर यात्रेच्या निमित्ताने खाद्य पदार्थांसह फुले, हार व खेळण्याची दुकाने सजली जाणार आहेत. त्यांची उभारणी करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यादरम्यान, आवास येथील श्री नागेश्वराच्या यात्रेला येणाऱ्या भक्तांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये, गर्दी होऊ नये, काही गैरप्रकार घडू नये म्हणून मांडवा सागरी पोलिसांमार्फत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात एकूण 35 पोलीस कर्मचारी, 12 वाहतूक कर्मचारी तसेच वडखळ येथील आरसीपी प्लाटून असणार आहेत. तसेच, यात्रांमध्ये अवैध धंदे दिसून आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले.







